अनधिकृत हॉटेलला महापालिकेच्या संरक्षणाची ‘नुक्कड’ डील!

Whatsapp image 2025 07 17 at 8.12.41 pm (1)

❝ कल्याण महापालिकेच्या ब प्रभागावर वशिला आणि बोरिंग प्रकरणात गंभीर आरोप❞

कल्याण : अजय शेलार 
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या  बिर्ला कॉलेज परिसरातील ‘नुक्कड’  नावाच्या अनधिकृत हॉटेलमध्ये बेकायदेशीर पाणीबोरींग खोदण्याचे काम सुरू असल्याची तक्रार मिळूनही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयाने कारवाईच्या नावाखाली केवळ औपचारिकता पूर्ण करत संपूर्ण प्रकरण थातुरमातुर मार्गाने मिटवण्याचा प्रकार उघड झाला आहे. पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोविंद प्रजापती यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर माहिती अधिकार कायद्यातून उघड झालेली कागदपत्रे प्रशासनाच्या भूमिकेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत.

३ जून २०२५ रोजी प्रजापती यांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बोरिंगविषयी माहिती दिल्यानंतर, ब प्रभागाच्या  सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र “फोन कट केलेला  कळत नाही का ? एकापाठोपाठ एक फोन करता?” अशा उत्तरांनी टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र केवळ बोरिंगचे साहित्य ताब्यात घेत पुन्हा

ब प्रभागाच्या  सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांच्या  तोंडी आदेशाने परत देण्यात आले . विशेष म्हणजे, याबाबत माहिती अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांमध्ये बोरिंगसाठी कोणतीही परवानगी होती का, अधिकाऱ्यांनी कोणती जबाबदारी घेतली का, याबाबत एकही ठोस माहिती दिलेली नाही. उलट वस्तू जप्त केल्याचे कबूल करताच त्याच वेळी कोणताही दंड न आकारता ती परत दिल्याची नोंद आहे. हेच नव्हे, तर सामान वाहून नेण्यासाठी महापालिकेच्या वाहनांचा वापर करून अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या कराच्या पैशाचा दुरुपयोग झाल्याचाही आरोप गोविंद प्रजापती यांनी केला आहे.प्रशासनाच्या निष्क्रियतेचे हे ज्वलंत उदाहरण असून, यामध्ये हप्तेखोरीचा स्पष्ट संशय व्यक्त होत आहे. “अनधिकृत हॉटेल चालवणाऱ्यांकडून दर महिन्याला हप्ते घेतले जातात. त्यामुळेच अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही,” असा थेट आरोपही प्रजापती यांनी केला. इतकेच नव्हे, तर हॉटेल नोंदणीकृत आहे का, त्याने कोणती अधिकृत फी भरली होती का, यासारखे मूलभूत प्रश्नही अद्याप अनुत्तरितच आहेत. परिणामी, ‘ब’ प्रभागाचे क्षेत्र अधिकारी व सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांचे वर्तन संशयास्पद ठरत असून त्यांच्यावर शिस्तभंगाची मागणी प्रजापती यांनी केली आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त प्रीती  गाडे यांना संपर्क साधला असता यांनी “मी बाहेर आहे”, “मला फारशी वस्तुस्थिती माहीत नाही” अशी धूसर व विसंगत उत्तरे देत संवाद अर्धवटच सोडून दिला.

या प्रकारामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारावर नागरिकांचा विश्वास उडू लागला आहे. नियम तोडणाऱ्यांना पाठीशी घालणारी आणि तक्रारदारांची दिशाभूल करणारी ही यंत्रणा आता पारदर्शकतेच्या व कायदाच्या कसोटीवर अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची बाब प्रजापती यांनी नमूद केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *