टिटवाळा : ग्रामस्थ मंडळ मांडा-कोळीवाडा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने श्री हनुमान जन्मोत्सव आणि आई गावदेवी एकवीरा जत्रा पालखी सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले. मांडा कोळीवाड्यातील प्रत्येक घरासमोर महिलावर्गाने सुंदर अश्या रांगोळ्या काढून आई गावदेवीच्या पालखीचे स्वागत केले.
शनिवारी, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता मारुती मंदिर (पूर्व) येथून श्री हनुमानाची पालखी मिरवणूक भव्य थाटामाटात निघाली. भजनी मंडळींचे गजर, बँड पथकाचे सुरेल वादन, आणि शेकडो महिला, पुरुष व बालगोपाळ भक्तगणांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. वाजत-गाजत, फुलांच्या सजावटीने नटलेली हनुमानाची पालखी मांडा पश्चिम कोळीवाड्यातील विविध परिसरातून चौकातून मोठ्या भक्तिभावाने फिरवण्यात आली. यानंतर रविवार, दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी गावादेव व पिंपळदेव यांचा साथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी सकाळपासूनच गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विशेष पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी यांचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर, कोळी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवत, आई गावदेवी एकवीरा मातेची पालखी मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. ढोल-ताशा, झांजपथक, बँड, फटाक्यांची आतषबाजी आणि भाविक भक्तांचे हरिपाठ, गजर यामुळे संपूर्ण कोळीवाडा दुमदुमून गेला होता. भक्तांनी वाजत-गाजत, नाचत-गात आई गावदेवीच्या पालखीचे स्वागत केले. या सोहळ्यात गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळे, तरुण मंडळे आणि लहानग्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. गावाच्या परंपरेनुसार श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती यांचा सुंदर संगम या जत्रा पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ मंडळ मांडा-कोळीवाडा आणि सर्व स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले. आलेल्य सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करून ग्रामस्थांनी हा सोहळा अधिक भक्तिपूर्ण आणि संस्मरणीय केला.














Leave a Reply