टिटवाळ्याचा ‘केतन बंटी गिते’ ठाणे जिल्हा संघात निवड — किशोर गटातील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत दाखवणार दमदार खेळी!

Img 20251104 wa0019

टिटवाळा, वार्ताहर : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे पुणे येथे ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ३६व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत टिटवाळा येथील साईकृष्णाई क्रीडा मंडळाचा खेळाडू केतन (बंटी) ज्ञानेश्वर गिते याची ठाणे जिल्हा ग्रामीण संघात अंतिम १४ खेळाडूंत निवड झाली आहे. या यशामुळे टिटवाळा व मांडा परिसरात अभिमानाची लाट पसरली आहे. केतन गिते हा मूळ नाशिक जिल्ह्यातील तळोशी (ता. घोटी) गावचा असून, त्याचे वडील पंधरा वर्षांपूर्वी रोजगाराच्या शोधात टिटवाळ्यात स्थायिक झाले. सध्या गिते परिवार मांडा कोळीवाड्यात वास्तव्यास असून, सामान्य कामगार म्हणून वडील मेहनत करतात. त्यांच्या मेहनतीचा व जिद्दीचा वारसा मुलगा केतनने घेतला आहे.

लहानपणापासून खेळाची आवड असलेल्या केतनने विद्यामंदिर मांडा येथे प्राथमिक शिक्षण घेतले असून, सध्या तो न्यू हायस्कूल, टिटवाळा येथे अकरावीला शिकत आहे. अभ्यासासोबतच कबड्डीप्रती असलेल्या त्याच्या आवडीमुळे त्याने साईकृष्णाई क्रीडा मंडळाच्या प्रशिक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव सुरु केला. शुभम गायकवाड, शुभम हांडे, राज भोईर, गौरांग शिंदे , शिवा राजपुत यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंसोबत ग्राउंडवर कठोर परिश्रम करत केतनने स्वतःला सिद्ध केले. त्याच्या या जिद्दीचे फळ म्हणूनच आज त्याची ठाणे जिल्हा संघात निवड झाली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल साईकृष्णाई क्रीडा मंडळाच्या वतीने केतनचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वाटचालीसाठी मंडळ आणि ग्रामस्थांकडून केतनला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “कष्ट, शिस्त आणि जिद्द असेल तर कोणतीही स्वप्नं दूर नाहीत,” असे प्रशिक्षक योगेश पाटील यांनी सांगितले. ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान पुणे, बोपखेल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणीत केतन ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्थानिक पातळीवरून राज्यस्तरापर्यंत पोहचलेल्या या तरुण खेळाडूने टिटवाळ्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *