डोंबिवली : डोंबिवली पूर्व परिसरात घर खरेदीच्या नावाखाली १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित नागरिकाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बांधकाम व्यावसायिक, त्याची पत्नी व मुलावर फसवणूक आणि धमकीचे आरोप करण्यात आले आहेत.
राजकुमार गुरव प्रजापती (वय ४९), रा. हेमंत प्लाझा बिल्डिंग, आयरे रोड, डोंबिवली (पूर्व) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप पंढरीनाथ पाटील या बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याची पत्नी रोहिणी पाटील यांनी डोंबिवली (पूर्व) येथील चोदावा मजला, बालाजी गार्डन परिसरात सुरू असलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील ९ सदनिकेतील ६५० चौ.फुट घर देण्याचा करार केला होता.
या घरासाठी एकूण १५ लाख रुपये विकासकाला अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले. विकासकाच्या वारंवार मागणीनंतर फिर्यादीने घरातील सोन्याची चैन व अंगठ्या गहाण ठेवून तसेच रोख रक्कम देऊन पैसे भरले. मात्र, बराच कालावधी उलटूनही सदनिका ताब्यात देण्यात आली नाही.
याबाबत विचारणा केली असता, दिलीप पाटील, त्याची पत्नी रोहिणी पाटील आणि मुलगा राहुल पाटील यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे फिर्यादी मानसिक तणावाखाली असून संपूर्ण कुटुंब असुरक्षिततेच्या भावनेत आहे.
या प्रकरणी ११ ऑगस्ट २०२४ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकार हा सरळसरळ आर्थिक फसवणूक असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीकडून करण्यात आली आहे.
डोंबिवलीत घर खरेदीदारांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असून प्रशासनाने अशा बांधकाम व्यावसायिकांवर कडक पावले उचलण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.













Leave a Reply