टिटवाळा : कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले असतानाच, संभाव्य महापौर म्हणून चर्चेत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली चौधरी-थवील यांनी महापौरपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी टिटवाळ्यातील प्रसिद्ध महागणपती मंदिरात दर्शन घेऊन अध्यात्मिक आशीर्वाद घेतले. या दर्शनामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला श्रद्धेचे अधिष्ठान लाभले असल्याच्या भावना कार्यकर्त्यानी व्यक्त केल्या .
कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांनंतर महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले असून, या जागेसाठी शिवसेनेने हर्षाली चौधरी-थवील यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी महापौरपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी भाजपकडून नगरसेवक राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत शुक्रवारची होती. मात्र दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने, येत्या ३ फेब्रुवारी रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा ही निव्वळ औपचारिक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तास्थैर्य आणि नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम उरलेला नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी टिटवाळ्यातील महागणपतीच्या चरणी नतमस्तक होत “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शक्ती, संयम आणि सद्बुद्धी लाभो” अशी प्रार्थना केल्याचे चौधरी-थवील यांनी सांगितले. त्यांच्या या कृतीमुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेला आगामी काळात स्थिर, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या दर्शनप्रसंगी टिटवाळ्यातील नगरसेवक संतोष (आप्पा) तरे यांनी हर्षाली चौधरी-थवील यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.













Leave a Reply