कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भूमीतून राष्ट्रीय रणांगणात; महाराष्ट्राचा गतका संघ मोहालीकडे रवाना
टिटवाळा, वार्ताहर : खेलो इंडिया, नॅशनल गेम्स, ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी तसेच स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) यांसारख्या मान्यताप्राप्त शासकीय स्पर्धांमध्ये खेळल्या जाणाऱ्या गतका या भारतीय पारंपरिक शस्त्रकला खेळात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली दमदार उपस्थिती नोंदवली आहे. महाराष्ट्रात मर्दानी खेळ जसा पारंपरिक शौर्यकलेचे प्रतीक मानला जातो, त्याच धर्तीवर पंजाबमध्ये विकसित झालेला गतका हा खेळ आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगाने लोकप्रिय होत आहे. या पार्श्वभूमीवर Gatka Federation of India यांच्या वतीने २८ ते ३० डिसेंबर दरम्यान चंदिगड (मोहाली) येथे आयोजित करण्यात आलेल्या सीनियर राष्ट्रीय गतका स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ उत्साहात रवाना झाला आहे.यात कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भूमीतले खेळाडू देखील या स्पर्धेचे मानकरी ठरले आहेत .
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे तब्बल २३ खेळाडू सहभागी होत असून त्यामध्ये १२ महिला आणि ११ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणून श्रीधर कमले जबाबदारी सांभाळत असून, संघ प्रशिक्षक म्हणून संस्थेच्या सचिव प्रा. आरती चौधरी मार्गदर्शन करणार आहेत. तर माध्यम समन्वयाची धुरा रोहन पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हा संपूर्ण संघ २६ डिसेंबर रोजी चंदिगडसाठी रवाना झाला.
महाराष्ट्रातील गतका चळवळीला सातत्याने बळ देणाऱ्या Association of Gatka Maharashtra च्या वतीनेही खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. संघटनेचे अध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष अश्विनी महांगडे, सचिव प्रा. आरती चौधरी, खजिनदार सायली जाधव, सदस्य रवींद्र चौधरी (निवृत्त आर्मी), मृण्मयी जाधव, अविनाश अनपट तसेच सर्व जिल्हा प्रतिनिधींनी खेळाडूंनी महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
या संघात ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील आंबिवली, मोहने आणि गालेगाव परिसरातील गुणवंत खेळाडूंचा विशेष सहभाग आहे. त्यामध्ये मंथन पवार, स्मित चौधरी, अथर्व नलावडे, धनुष बाबू, धीरज कोट, सुशांत भंडारे, रोहन पवार, मानसी पवार यांच्यासह इतर खेळाडूंचा समावेश आहे. ग्रामीण आणि उपनगर भागातून पुढे येत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंमुळे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गतका या पारंपरिक खेळाच्या प्रसारासाठी हा संघ निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.













Leave a Reply