वाढदिवसाची अनमोल भेट; राज ठाकरे यांनी सोपवली दिनेश भोय यांच्यावर नवीन जबाबदारी

Whatsapp image 2025 12 27 at 4.32.00 pm

प्रामाणिक कामाचा आलेख ठळक; मनसेत दिनेश भोय यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती

निष्ठा, तळमळ आणि संघटनशक्तीचा गौरव; दिनेश भोय उपजिल्हाध्यक्षपदी विराजमान

टिटवाळा :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तळागाळात प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीची योग्य दखल घेतली जात असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. टिटवाळा येथील मनसेचे सक्रिय पदाधिकारी दिनेश भोय यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण पश्चिम विधानसभा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते मनसे कल्याण शहर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पक्षासाठी केलेले अथक परिश्रम, संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांशी असलेली थेट नाळ यामुळेच त्यांच्यावर ही नवी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पक्षांतर्गत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ही नियुक्ती राज ठाकरे यांच्या आदेशानुसार उपनेते व आमदार राजूदादा पाटील तसेच ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. यासाठी प्रदेश सरचिटणीस आमदार व कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांचे सहकार्य लाभले असून, सर्व पदाधिकारी व सहकारी कार्यकर्त्यांच्या विश्वासातून ही निवड झाल्याची भावना दिनेश भोय यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रक्रियेतून पक्ष नेतृत्वाचा कार्यकर्त्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना दिनेश भोय म्हणाले की, पक्षाप्रती असलेली निष्ठा, संघटन वाढीसाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि तळमळीने केलेले काम याचीच ही पोचपावती आहे. विशेष म्हणजे उद्याच त्यांचा वाढदिवस असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांनी दिलेली ही जबाबदारी ही वाढदिवसाची अनमोल भेट असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नाही, तर पक्षासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिनेश भोय यांचा कार्याचा आलेख पाहता ते केवळ पदाधिकारी न राहता, एक प्रामाणिक, निष्ठावंत आणि तळमळीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. टिटवाळा आणि कल्याण परिसरात संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढणे, तसेच पक्षाची भूमिका सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यशैलीमुळेच आज त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

या नियुक्तीची बातमी समजताच टिटवाळा व कल्याण परिसरातून दिनेश भोय यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मिळालेली ही जबाबदारी मनसेसाठी अधिक जोमाने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची नवी सुरुवात ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *