शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक – केडीएमसी आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़

कल्याण : कुणाल म्हात्रे 

शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी केले. NEP 2020 म्हणजेच शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकवृंदास प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते, त्यावेळी उपस्थित शिक्षक वर्गाचे संबोधिताना महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील रहावे असेही त्या पुढे म्हणाल्या.

या चर्चासत्रात आर के टी  महाविद्यालयाच्या म‍ाधवी निकम यांनी सामाजिक संस्थाद्वारे (ग्रामीण भागातील) शाळांचा विकास या विषयाबाबत माहितीपूर्ण विवेचन केले. तर कल्याण (पूर्व) येथील आर्य गुरुकुल या शाळेच्या दिव्या बोरसे यांनी शाळांमध्ये, शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर या विषयाबाबत उपस्थितांना माहिती दिली.  बिर्ला महाविद्यालयाचे डॉ.नरेश चंद्र यांनी नविन शैक्षणिक धोरणाबाबत सखोल माहिती उपस्थित शिक्षक वर्गास दिली आणि या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल महापालिका आयुक्तांचे आभार मानीत, महापालिकेच्या शाळा या शहरासाठी अभिमान ठराव्यात अशा आशावाद व्यक्त केला.

पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी पर्यावरण शाळेविषयी माहिती दिली. योगप्रशिक्षक विणा निमकर, नाट्य प्रशिक्षक रश्मी घुले, आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या कृतीका, राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक अंकुर आहेर, दैनिक लोकमतचे प्रशांत माने आणि कल्याण कला आध्यापक संघाचे विनोद शेलकर यांनी देखील आपापल्या रसाळ भाषा शैलीत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले.

बदलते शैक्षणिक धोरण व त्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणारे प्रश्न याबाबतची माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. आपण ज्ञानप्रचुर असणे व विद्यार्थी घडविणे, हे शिक्षकांचे सर्वात महत्वाचे काम आहे, असेही विचार त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *