ठाणे-डोंबिवलीसह मुंबई महानगरात 50 ठिकाणी योगाभ्यास शिबिरे संपन्न
कल्याण : आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने आज 21 जून रोजी संत निरंकारी मिशनच्या वतीने संपूर्ण भारतवर्षातील मिशनच्या विविध शाखांमध्ये योगाभ्यास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये ठाणे-डोंबिवली परिसरासह मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 50 हून अधिक ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये शेकडोंच्या संख्येने निरंकारी बंधु-भगिनींनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला.
पावसाळी वातावरणाचा विचार करुन हे आयोजन मुख्यत्वेकरुन जागोजागी असलेल्या संत निरंकारी सत्संग भवनांमध्ये करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भाविक-भक्तगणांनी योगाचे शिक्षण प्राप्त करण्याबरोबरच नियमितपणे योगाभ्यास करण्याची प्रेरणा प्राप्त केली. सर्व ठिकाणी हे कार्यक्रम सकाळी 6 ते 7 या वेळात आयोजित करण्यात आले.
ठाण्यातील पाचपाखाडी, कळवा, वागळे इस्टेट, भाईंदर तसेच डोंबिवली व पुढील परिसरामध्ये डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर इत्यादि वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. नवी मुंबईतील सानपाडा, वाशी, ऐरोली (साठे नगर), खारघर, उरण तसेच मुंबईतील चेंबूर, नेव्ही नगर, वडाळा, दादर, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, घाटकोपर, विक्रोली, भांडूप, मुलुंड इत्यादि ठिकाणी योगाभ्यास प्रशिक्षण शिबिरे संपन्न झाली.
संयुक्त राष्ट्र संघाकडून विश्वकल्याणासाठी जगभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये संत निरंकारी मिशन सातत्याने आपले योगदान देत आहे. या वर्षी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा विषय ‘महिला सशक्तिकरणासाठी योग’ लक्षात घेऊन मिशनमार्फत पुरुषांबरोबरच महिला भक्तगणांनाही योग शिबिरांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. परिणामी महिलांनीही या योगाभ्यास कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतला.














Leave a Reply