टिटवाळा नगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले आकाशदर्शनाचे अनोखे क्षण

Whatsapp Image 2025 02 02 At 10.39.54 Am


टिटवाळा :
महाराष्ट्र – अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे, The Science Point- Activity Adda टिटवाळा आणि The Young Scientist Den बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 1 फेब्रुवारी रोजी सरस्वती विद्यालय, घोटसई येथे आयोजित आकाशदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष टेलिस्कोपच्या साहाय्याने ग्रह, तारे, नक्षत्रे आणि आकाशगंगेचे अद्भुत दृश्य अनुभवले.

व्हॉट्सअ‍ॅप आणि इंटरनेटवर मिळणाऱ्या अपुऱ्या आणि बऱ्याचदा फसव्या माहितीच्या पलीकडे जाऊन, प्रत्यक्ष आकाश निरीक्षणाचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरला. या अवकाश सफरीत विद्यार्थ्यांना पृथ्वीचे स्थान, सूर्यमाला, आकाशगंगा आणि संपूर्ण विश्व यांची तुलनात्मक माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालक अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी पाहून भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात विज्ञानप्रेमी किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानाच्या काही चमत्कारिक प्रयोगांनी झाली. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन कसा महत्त्वाचा आहे, यावर भाष्य केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना आकाशदर्शनासंबंधी प्राथमिक माहिती देण्यात आली. नंतर टेलिस्कोपच्या साहाय्याने शनी, शुक्र आणि गुरु ग्रह यांचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे, गुरु ग्रहाच्या उपग्रहांचे थेट निरीक्षण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. याशिवाय, चंद्राची कोर, तारकापुंज आणि आकाशगंगेतील काही भागांचा अभ्यासही करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारले, ज्यांची प्रकाश पारखे सर यांनी सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत उत्तरे दिली. या उत्तरांमुळे अनेक जिज्ञासू विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर झाल्या आणि त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे वाटचाल सुरु झाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला. अनेकांनी पहिल्यांदाच प्रत्यक्ष ग्रह आणि तारे पाहण्याचा आनंद घेतला.

The Science Point- Activity Adda (9321244819) यांच्यातर्फे टिटवाळा आणि परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. या कार्यक्रमाला टिटवाळा शहर आणि परिसरातील विविध विद्यालयातील विद्यार्थी, पालक, The Science Point Activity Adda चे किशोर पाटील, महा अंनिसचे पदाधिकारी किरण ईशी, सरस्वती विद्यालयाचे शिंगोळे सर आणि The Young Scientist Den चे कार्यकर्ते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अंतराळाच्या गूढ जगाची ओळख पटली आणि विज्ञानाविषयी अधिक आत्मीयता निर्माण झाली. भविष्यात देखील असेच कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अद्भुत दुनियेत झेप घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल.असे यावेळी आयोजकांनी सांगितले .

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
“काय भारी दिसत होतं! आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात हे सर्व दिलेले आहे, पण प्रत्यक्ष पाहताना खूप मज्जा आली. मला आता नक्षत्र आणि तारकापुंज कायम लक्षात राहतील.” – आरुष पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *