निलेश कासट-डहाणू,
युवा एल्गार आघाडी, महाराष्ट्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना डहाणू तालुका संघटक तसेच समाजसेवक अँड. विराज गडग यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी वाणगाव येथे मोफत डोळे तपासणी, रक्त तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर वाणगाव येथील युवा एल्गार आघाडीच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू राहणार असून, स्थानिक नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन युवा एल्गार आघाडीच्या वतीने करण्यात आले असून, या उपक्रमाला जिल्हाध्यक्ष अनिल नाठे यांची प्रमुख भूमिका आहे.
अँड. विराज गडग हे गेली १५ ते १७ वर्षे समाज कार्यात सक्रीय असून त्यांनी विधवा, निराधार, वृद्ध, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य, मार्गदर्शन व विविध शासकीय दाखल्यांचे वाटप यासारखी कामे त्यांनी सातत्याने केली आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपला वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. “समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळावी, हाच वाढदिवस साजरा करण्यामागचा खरा हेतू आहे,” असे अँड. विराज गडग यांनी सांगितले.

या शिबिराद्वारे गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. डोळ्यांची तपासणी, रक्त तपासणी आणि रक्तदानासारखे उपक्रम हे समाजासाठी आवश्यक असून, आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा एल्गार आघाडीचे कार्यकर्ते, स्थानिक डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा एल्गार आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
















Leave a Reply