नेरळ-कर्जत रस्त्यावर हिल रॉक रिसॉर्टसह अनधिकृत बंगले: बिनशेती परवाना, ग्रामपंचायतीकडून नोंद, महसूल विभाग कारवाई करणार?

Whatsapp image 2025 07 23 at 8.16.21 pm

कर्जत:-
कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्याच्या अगदी कडेला हिल रॉक रिसॉर्ट आहे.वाणिज्य वापर करणाऱ्या कोणत्याही बांधकामासाठी शासनाच्या नगररचना विभागाकडून बिनशेती जमीन असावी लागते.मात्र अनेक बंगले आणि इमारती तसेच स्विमिंग पूल उभारणाऱ्या हिल रॉक रिसॉर्टची जमीन आजही बिनशेती मध्ये रूपांतरित झालेली नाही.दरम्यान अशा वाणिज्य वापर करणाऱ्या बांधकामांवर महसूल विभाग कारवाई करणार आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या बांधकाम विषयी ग्रामपंचायत मध्ये अनधिकृत अशी नोंद असून किरकोळ घरपट्टी संबंधित जमीन मालक भरत आहे.
जिते ग्रामपंचायत हद्दीत कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ ग्रामपंचायत हद्दीच्या लागून असलेल्या जिते गावच्या हद्दीत हिल रॉक रिसॉर्ट उभे आहे.या रिसॉर्टचे उभारणीसाठी जमिनीचे बिनशेती मध्ये रूपांतर होणे आवश्यक असते.त्यानंतर बांधकाम करून त्या इमारतींचा वापर वाणिज्य स्वरूपात करता येतो.त्यात हिल रॉक हे रिसॉर्ट उभ्या असलेल्या सर्व्हे नंबर ८२ मधील कोणतेही क्षेत्र हे बिनशेती म्हणून मान्यता दिलेले नाही.नगररचना विभागाकडे या भागातील शेतजमीन मालकांनी मागणी केली आहे.मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून या जमीन मालकांना ना हरकत परवाना मिळालेला नाही.त्याचा परिणाम रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून बिनशेती दाखला देण्यात आलेले नाहीत.मात्र तरीदेखील हिल रॉक सारखे रिसॉर्ट येथील पाच एकर जमिनीवर उभे राहिले आहे.त्या ठिकाणी काही बंगले बांधण्यात आले आहेत,जमिनीवर एक टोलेजंग इमारत देखील उभी असून या सर्व बांधकाम वर उभ्या असलेल्या वास्तूंचा वापर वाणिज्य वापर म्हणून केला जात आहे.तर जमीन बिनशेती केली नसताना तेथे विहिरी खोदण्यात आल्या असून या जमीन मालकावर कोणाचा वरदहस्त आहे याची चर्चा सुरू आहे.
बिनशेती परवाना नगररचना आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेला नसताना त्या ठिकाणी इमारत बांधकाम झाले आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने त्याबाबत बांधकाम परवानगी देताना कोणत्या कागदपत्रांचे आधारे बांधकाम परवानगी दिली याचा देखील विचार तालुक्याचे तहसीलदार यांनी करायला हवा अशी मागणी केली जात आहे. बिनशेती परवाना नसताना कोणत्याही प्रकारचा तरण तलाव यांचे उभारणी करता येत नाही. तरण तलाव निर्मिती ही पूर्णपणे जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत विषय असतो.मात्र त्याठिकाणी जमीन बिनशेती नसल्याने खोदण्यात आलेल्या तरण तलावाचे पाण्यात बुडून कोणता अपघात झाला तर त्याला कारणीभूत कोण असा प्रश्न समोर आला आहे.दुसरीकडे जमीन बिनशेती नसल्याने महसूल खात्याला आवश्यक कर देखील वसूल करता येत नाही.त्यामुळे हिल रॉक रिसॉर्ट मध्ये करण्यात आलेले बांधकाम आणि त्यावर सुरू असलेला वाणिज्य वापर हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.त्या जमीन मालकाकडून शासनाचा कर बुडविला जात असून हिल रॉक रिसॉर्ट बिनशेती जमिनीवर उभे राहिले नसताना त्या रिसॉर्टला आशीर्वाद कोणाचा हा प्रश्न कायम आहे.या रिसॉर्ट मालकाकडून शुभ कार्ये तसेच रिसॉर्ट मध्ये गेली तीन चार वर्षे सुरू आहेत आणि असे असताना महसूल बुडविण्याचे काम रिसॉर्ट मालक करीत आहे.

चौकशीचे आदेश..
डॉ धनंजय जाधव तहसीलदार
कर्जत नेरळ रस्त्यावरील हिल रॉक रिसॉर्ट संबंधी तक्रारी आमच्या कार्यालयाकडे आल्या असून नेरळ मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

बांधकाम अनधिकृत..
जिते ग्रामपंचायत मध्ये सदर जमिनीला बिनशेती परवानगी नसल्याने त्या जमीन मालकाच्या बांधकामा यांना देण्यात आलेल्या असेसमेंट उताऱ्यावर अनधिकृत अशीच नोंद असल्याची माहिती जिते ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे.ग्रामपंचायतची फसवणूक देखील हिल रॉक कडून होत जवळपास नऊ बंगले यांचे यांना अद्याप कोणतेही कर लावण्यात आले नाही.कर लावण्यासाठी ग्रामपंचायत तगादा लावत असून देखील हिल रॉक चे मालक कर भरत नाहीत अशी माहिती ग्रामपंचायत कडून देण्यात आली आहे.तर फक्त २६४०० एवढी घरपट्टी हिल रॉक कडून जिते ग्रामपंचायतीला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *