ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ठाणे जिल्ह्याच्या क्रीडाक्षेत्राला नवा अभिमान मिळाला. कल्याण तालुक्यातील कोळीवली गावचे सुपुत्र आणि साहसी हवाई क्रीडाप्रकारातील नावाजलेले खेळाडू अजित बळीराम कारभारी यांचा ठाणे जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडला.
अजित कारभारी हे स्व. कुस्तीपटू बळीराम कारभारी यांचे सुपुत्र असून त्यांनी स्काय डायव्हिंग आणि पॅराजम्पिंगसारख्या धाडसी हवाई क्रीडाप्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, क्रीडा प्रशिक्षक समीर सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात नागरिक, युवक-युवती आणि खेळाडूंना साहसी क्रीडाप्रकारांच्या माध्यमातून तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा संदेश देण्यात आला. स्काय डायव्हिंग व पॅराजम्पिंग सारख्या खेळांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सर्वांनी पुढे यावे आणि ठाणे जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन अजित कारभारी यांनी उपस्थितांना केले.















Leave a Reply