टिटवाळा : कल्याण येथील मॅक्सी ग्राउंडवर रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘विजयी संकल्प मेळावा’ प्रचंड उत्साहात व मोठ्या जनसहभागात पार पडला. या मेळाव्यात झालेल्या जाहीर पक्षप्रवेशामुळे कल्याण–टिटवाळा परिसरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या मेळाव्यात टिटवाळा येथील मनसेचे विभाग अध्यक्ष मधुकर भोईर, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, उपशाखा अध्यक्ष जगन्नाथ भोईर व उपशाखा अध्यक्ष जनार्दन भोईर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. एकूण ५३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीरपणे भाजपाची वाट धरल्याने परिसरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप टिटवाळा शहर अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
मेळाव्यात उपस्थित नेत्यांनी या प्रवेशाकडे केवळ पक्षांतर म्हणून न पाहता विकासाभिमुख राजकारण, संघटनबळाची मजबुती आणि ‘मिशन महानगरपालिका’कडे नेणारा निर्णायक टप्पा म्हणून पाहावे, असे मत व्यक्त केले. या पक्षप्रवेशामुळे टिटवाळा–कल्याण परिसरात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.















Leave a Reply