कर्जत : नितीन पारधी
कर्जत तालुक्यातील नेरळ–कशेळे रस्त्यालगत अंजप येथे असलेल्या ‘स्पेस वर्ल्ड’ बिल्डिंग बुकिंग ऑफिसला मंगळवारी (१७ मार्च २०२६) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून संपूर्ण ऑफिस जळून खाक झाले. या आगीने आसपासच्या जंगलातील कोरडे गवत आणि लहान झाडांना वेगाने कवेत घेतल्याने काही वेळातच आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण परिसर धगधगू लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुकिंग ऑफिसच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली गवत असल्याने आगीने झपाट्याने फैलाव घेतला. सुरुवातीला स्थानिक आत्रांड-नीड, अंजप तसेच परिसरातील ग्रामस्थांनी तत्परतेने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण ठरले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मंडलिक आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेची माहिती ‘स्पेस वर्ल्ड’चे मालक विनय सिंग यांना देण्यात आली असता, त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या पंचनाम्यावेळी अंजप गावाचे माजी सरपंच रामचंद्र मिणमिणे, पत्रकार रामदास माळी, संबंधित वॉचमन तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
व्हिडीओ पहा : 👉🏽 https://www.youtube.com/watch?v=nwmcvm7ivQw















Leave a Reply