शिवणकाम, अगरबत्ती व साबण निर्मिती प्रशिक्षणाला सुरुवात; महापौरांच्या हस्ते किट वितरण
कल्याण : रोशन उबाळे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथी नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तृतीयपंथी समाजाला स्वावलंबनाच्या दिशेने मोठा आधार मिळणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत तृतीयपंथी बांधव-भगिनींसाठी शिवणकाम, अगरबत्ती व साबण निर्मिती यांसारख्या कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. बुधवारी मार्च २०२६ रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर हर्षाली चौधरी आणि उपआयुक्त कांचन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींना शिवणकाम किटचे वितरण करण्यात आले.
महापौर हर्षाली चौधरी यांनी तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. विविध योजनांच्या माध्यमातून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढील काळातही अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे तृतीयपंथी नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळणार आहे. समाजात सन्मानाने जीवन जगण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्याचा मार्ग मोकळा होत असून समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Reply