विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला ‘बालमनरंग’ची नवी ओळख; टिटवाळ्यात काव्यप्रतिभेचा उत्सव रंगला

विद्यामंदिर मांडा येथे स्वरचित कवितासंग्रहाचे प्रकाशन; बालकवींच्या भावविश्वाला मिळाले व्यासपीठ

टिटवाळा : विद्यार्थ्यांच्या अंतर्मनातील भावना, कल्पनाशक्ती आणि विचारांना शब्दरूप देणाऱ्या ‘बालमनरंग’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाने टिटवाळ्यात एक अनोखा साहित्यिक सोहळा अनुभवायला मिळाला. छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचालित विद्यामंदिर मांडा, टिटवाळा आणि वारकरी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ३० मार्च २०२६ रोजी हा प्रेरणादायी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

शाळेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांचे पुस्तक प्रकाशित होत असल्याने हा क्षण सर्वांसाठी अभिमानाचा ठरला. लहान वयातच विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, स्वप्ने आणि अनुभव कवितांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडत आपल्या काव्यगुणांची झलक दाखवली. या कवितांना पुस्तकाचे रूप देत वारकरी प्रकाशनाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

या सोहळ्याला वारकरी प्रकाशन संस्थेचे प्रमुख, कवी, लेखक, पत्रकार आणि ग्राफिक डिझायनर मा. राहुल मुंढे, शाळेचे मुख्याध्यापक मा. दिनेश भामरे, उपमुख्याध्यापक मा. प्रमोद पाटील, मराठी विषयाच्या शिक्षिका व कवयित्री सायली कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक मारुती शिंगोळे तसेच या काव्यसंग्रहाची संपादिका म्हणून जबाबदारी सांभाळणारी इयत्ता नववी ‘इ’ची विद्यार्थिनी कु. यज्ञिका जगन गायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ‘बालमनरंग’चे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.

काव्यसंग्रहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे, तसेच या उपक्रमामागील शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देत त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारा हा उपक्रम भविष्यातील साहित्यिक घडविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

‘बालमनरंग’च्या माध्यमातून उमललेल्या या कोवळ्या काव्यकळ्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या आयुष्यात प्रेरणेचा नवा दीप ठरणार असून, टिटवाळ्यातील शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात या उपक्रमाची विशेष चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *