टिटवाळ्यात प्रथमच राज्यस्तरीय काव्यसंमेलन; “महामानवाला करू सलाम” उपक्रमाची दमदार सुरुवात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साहित्याची दिंडी; तरुणांमध्ये वाचन संस्कृती जागवण्याचा अनोखा प्रयत्न

टिटवाळा: प.पू. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत टिटवाळा येथील हरी ओम व्हॅली सोसायटी फेज-२ येथे प्रथमच “महामानवाला करू सलाम” या संकल्पनेतून निःशुल्क राज्यस्तरीय भव्य काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात साहित्यिक आणि सामाजिक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

या काव्यसंमेलनाचा संपूर्ण खर्च गेली १५ वर्षे टिटवाळा परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये निस्वार्थ सेवा देणारे सामाजिक सेवक आणि कलावंत  राजेंद्र मधुकर सावंत यांनी स्वतः उचलला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे आणि साहित्यप्रेमामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “साहित्याची दिंडी” ही अभिनव संकल्पना प्रथमच टिटवाळा शहरात राबविण्यात येत असून साहित्य आणि विचारांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या कवी-कवयित्रींना आपली कला सादर करण्यासाठी विचारमंच  उपलब्ध होणार असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी कवींना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची विशेष व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.

या काव्यसंमेलनामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे तरुण पिढीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आदर, प्रेम आणि त्यांच्या विचारांची जाणीव निर्माण करणे तसेच वाचन संस्कृतीला चालना देणे हे आहे. आजच्या डिजिटल युगात कमी होत चाललेल्या वाचनाच्या सवयी पुन्हा रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टिटवाळ्यात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय काव्यसंमेलनामुळे साहित्यप्रेमींसह नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून हा सोहळा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *