टिटवाळ्यात गॅससाठी जनतेची धावपळ; दोन दिवसांपासून पहाटेपासून दुपारपर्यंत रांगा, रोजगाराचा बळी

टिटवाळा , वार्ताहर  : गॅस सिलेंडर टंचाईचा फटका आता थेट सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्याला बसू लागला असून टिटवाळा पश्चिमेकडील जानकी विद्यालयाजवळील वासुंद्री रोडवरील गणेश प्रतिमा चौक परिसरात गेल्या दोन दिवसांपासून भारत गॅस कंपनीच्या ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की अनेक नागरिकांना सकाळी ६ वाजल्यापासूनच रांगेत उभे राहावे लागत असून दुपारपर्यंतही त्यांना सिलेंडर मिळेल याची खात्री नसल्याचे चित्र दिसत आहे.

घरगुती गॅससारख्या अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना अशा प्रकारे तासन् तास रांगेत उभे राहावे लागणे ही प्रशासन आणि वितरण व्यवस्थेची मोठी अपयश मानली जात आहे. विशेष म्हणजे अनेक कामगार, नोकरदार आणि छोटे व्यावसायिक आपला दिवसाचा रोजगार सोडून गॅससाठी रांगेत उभे राहत असल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वर्गातील लोक या त्रासाला सामोरे जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. काही ठिकाणी वितरण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचीही चर्चा असून, “बुकिंग करूनही गॅस मिळत नसेल तर व्यवस्था नेमकी कुठे अडकते?” असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. रस्त्यावरच सिलेंडरच्या रांगा लागल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गॅस वितरण सुरळीत करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या तरी नागरिकांना केवळ प्रतीक्षेचा खेळ सहन करावा लागत असून, गॅससारख्या मूलभूत गरजेच्या वस्तूसाठी अशी परिस्थिती निर्माण होणे हे चिंताजनक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *