111% वसुलीचा विक्रम! मांडा ग्रामीण महावितरण शाखेची दमदार झेप; थकबाकीतही मोठी घट

टिटवाळा , मांडा — महावितरणच्या मांडा ग्रामीण शाखेने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वीजबिल वसुलीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत एक नवा मापदंड निर्माण केला आहे. निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक वसुली करत शाखेने केवळ आपली कार्यक्षमता सिद्ध केली नाही, तर संपूर्ण विभागासाठी आदर्श निर्माण केला आहे. मांडा रुरल सेक्शनचा एकूण डिमांड 7.74 कोटी रुपये असताना प्रत्यक्ष वसुली तब्बल 8.60 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच 111.07 टक्के इतकी भक्कम वसुली नोंदवून शाखेने ‘टार्गेट ओलांडण्याचा’ विक्रमच केला आहे. ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, प्रभावी व्यवस्थापन आणि अचूक नियोजनाचे प्रतीक मानली जात आहे.

विशेष म्हणजे, वसुलीबरोबरच थकबाकी कमी करण्यातही मांडा ग्रामीण शाखेने मोठे यश संपादन केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 10 लाख रुपयांची थकबाकी कमी करण्यात आली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, ग्राहकांशी संवाद आणि वेळेवर कारवाई या त्रिसूत्रीच्या जोरावर हे यश साध्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या यशामागे शाखा अभियंता तुकाराम गोपाळ घोडविंदे, सहाय्यक अभियंता तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे एकत्रित आणि समन्वयित प्रयत्न निर्णायक ठरले. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने केलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. मांडा ग्रामीण शाखेने केवळ लक्ष्य पूर्ण केले नाही, तर ते ओलांडून कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आगामी काळातही हीच कामगिरी अधिक उंचीवर नेण्याचा निर्धार शाखेकडून व्यक्त करण्यात आला असून, महावितरणच्या इतर शाखांसाठीही हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *