प्रतिनिधी- मोहन गारे
महाराष्ट्र अपडेट 24( माळशेज घाट)
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आज सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या परिसरातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या साखरवाडी गावाच्या परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपुन काढले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील सार्वजनिक मालमत्तेसह खाजगी घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की गावातील ठिकाणी असलेल्या समाज मंदिरावरील पत्रे उडून लांब वर फेकले गेले आणि समाज मंदिराचे छत पूर्णपणे उघडे पडल्यामुळे आतील सामानाचे आणि भिंतीचेही पावसामुळे नुकसान झाले आहे हे मंदिर गावातील सार्वजनिक कार्यक्रम किंवा बैठकांसाठी महत्वाचे ठिकाण असल्याने आता ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. या अवकाळी पावसामुळे सार्वजनिक मालमत्ताच नव्हे तर गावातील तीन कौलारू घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे या घरांवरील कौले उडून फुटली. यामुळे घरांच्या छताचे आणि भिंतींचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील अन्नधान्य कपड्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालू परसू सोंगळ, महादू दत्तू भला, कमल आंबो भला, या तीन कुटुंबांच्या घरांचे यामध्ये नुकसान झाले आहे.या संकटामुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अचानक आलेल्या पावसाने डोक्यावरचे छत हिरावले असून आता राहायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना तसेच समाज मंदिराच्या दुरुस्तीसाठी तातडीने मदत निधी जाहीर करावा अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी केली आहे.














Leave a Reply