कल्याण : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, कुरार व्हीलेज, मालाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदु ऑपरेशन शिबिरात 210 गरीब व गरजू नागरीक लाभान्वित झाले.
या शिबिरामध्ये 10 व्यक्तींना मोतीबिंदु असल्याचे आढळून आल्याने त्यांचे मोफत ऑपरेशन होण्यासाठी त्यांना के.बी.हाजी बच्चुअली चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडे संदर्भित करण्यात आले. या व्यतिरिक्त 40 व्यक्तींना चष्मे वाटण्यात आले. तर उर्वरित नेत्ररुग्णांना मोफत औषधोपचार देऊन डोळ्यांची निगा राखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये नॅशनल एसोसिएशन फॉर ब्लाईंड आणि पोदार हॉस्पिटल, मुंबई येथील नेत्र तज्ञांनी नेत्र तपासणीच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले.
मंडळाच्या समाज कल्याण विभागातील समन्वयक प्रेमा ओबेरॉय यांनी या शिबिराच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली. संत निरंकारी मिशनच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वरळी नाका म्युनिसिपल स्कूल, मुंबई येथे अशाच नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले जाते जे सर्वांसाठी नि:शुल्क खुले असते. याच्या रजिस्ट्रेशनचा कालावधी सकाळी 9 ते 11 असा असतो. या शिबिराचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.














Leave a Reply