काळू नदी स्वच्छतेसाठी टिटवाळ्यात स्वामी भक्तांचा पुढाकार

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या पुढाकारातून नदी स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

टिटवाळा  :  अजय शेलार 

“नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती जीवनवाहिनी आहे” हा संदेश देत टिटवाळ्यात काळू नदी स्वच्छता व जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) टिटवाळा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता आणि जलसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

आज रविवारी सकाळी गणेश घाट, काळू नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर सेवेकरी, महिला, युवक आणि स्थानिक नागरिक एकत्र आले. “नदी हीच माता, तीच आपली जीवनदाता” अशा घोषणा देत नदी परिसरातील प्लास्टिक कचरा, साचलेला घाणकचरा आणि प्रदूषणकारी वस्तू हटवून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीकाठ स्वच्छ करताना सहभागी नागरिकांनी पर्यावरण रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.

या अभियानात नदी स्वच्छता व जलसंवर्धन प्रतिज्ञा, नदीचा मान-सन्मान राखण्याचा संदेश, प्रदूषणमुक्त वातावरणासाठी जनजागृती तसेच नदी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्यात आला. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी स्वतः हातात झाडू घेत परिसर स्वच्छ करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.

कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधी आणि प्रार्थनेने करण्यात आली. नदी व निसर्ग संवर्धनासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदी परिसरातील वाढते प्रदूषण, प्लास्टिकचा वापर आणि अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या सेवेकऱ्यांनी “स्वच्छ नदी, सुरक्षित भवितव्य” हा संदेश देत समाजातील प्रत्येक घटकाने नदी संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टिटवाळ्यात पार पडलेल्या या अभियानामुळे काळू नदी परिसरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा उपक्रमांची मालिका राबविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणीय जाणीवेचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *