पुरात अडकलेल्या नागरिकांना भेटला विठूराया…

“विठू माझा लेकुरवाळा…” पूराच्या पाण्यात खांद्यावर चिमुकल्याला घेऊन चालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यात दिसला वर्दीतला विठुराया!

पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी व सहकाऱ्यांची धाडसी बचावमोहीम; गणेशनगरातील ८५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

टिटवाळा: अजय शेलार 

“विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा…” हा संतांचा अभंग आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. खांद्यावर लेकरांना घेऊन भक्तांच्या रक्षणासाठी चालणारा विठुराया आज केवळ मंदिरात नाही, तर खाकी वर्दीतही दिसत आहे. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशाच संकटाच्या काळात पडघा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवाची पर्वा न करता केलेले कार्य म्हणजे जणू ‘वर्दीतला विठुराया’च असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

पडघा पोलीस स्टेशन हद्दीतील खडवली-पडघा परिसरातील गणेशनगर येथे पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ बचावमोहीम हाती घेतली. कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी एकामागोमाग एक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी मोहिमेत एकूण ८५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

या बचावकार्यादरम्यान जोशना साळुंखे (६०), देविका पवार (४), अश्विनी पवार (२५) आणि संतोष पवार (२८) हे पुराच्या पाण्यात अडकले होते. पोलिसांनी वेळेवर मदतीचा हात पुढे करत त्यांना सुखरूप बाहेर काढले. खांद्यावर एका चिमुकल्याला घेऊन पूराच्या पाण्यातून मार्गक्रमण करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्या क्षणी खाकी वर्दीतील अधिकारी नव्हे, तर माणुसकीचा विठुरायाच नागरिकांच्या मदतीला धावून आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

आज समाजाला अशाच संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे. खाकी वर्दी ही केवळ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नसून, संकटात धावून जाणाऱ्या माणुसकीचे प्रतीक आहे, हे पंकज गिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.

पूर ओसरेल, पावसाळा संपेल, पण संकटाच्या पाण्यात खांद्यावर चिमुकल्याला घेऊन चालणारा ‘वर्दीतला विठुराया’ नागरिकांच्या मनात कायमचा कोरला जाईल. अशा कर्तव्यदक्ष आणि मानवतेचा धर्म जपणाऱ्या सर्व खाकीधाऱ्यांना मनापासून सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *