केडीएमसीच्या भांडार विभागातील निवीदेची चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना निर्देश  

भांडार विभागाने काढलेली निविदा संशयाच्या भोवऱ्यात?

कल्याण : कुणाल म्हात्रे 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भांडार विभागाने काढलेली निविदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. या वादग्रस्त निवीदेची चौकशी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केडीएमसी आयुक्तांना दिले आहेत.

      केडीएमसी भांडार विभागामार्फत छपाई कामाबाबत चौकशी करुन दोषी जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर (राम) पातकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.  केडीएमसी भांडार खात्यातील छपाई कामामध्ये अनियमितता व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, गेली दोन वर्ष छपाई कामामध्ये अर्थ संकल्पातील तरतूद पेक्षा जास्त ३ कोटी रुपये खर्च झालेला दिसून येतो, याची अधिकारी नेमून तातडीने चौकशी करण्याची गरज आहे व चौकशी अंती जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी राम पातकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. पातकर यांच्या पत्राची दखल घेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्तांना दिले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भांडार विभागाने निविदा एकतर्फी काढत या निविदांमध्ये भाग घेणाऱ्या निविदाकाराकरिता नव्याने अट घालीत त्यामध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयामधील सुमारे तीन कोटी रुपयांचे सलग तीन वर्ष टर्नओव्हर असल्याचे नमूद केल्याने स्पर्धात्मक निविदा येणे बंद होणार असल्याने ही बाब कोणत्यातरी कंत्राटदारास फायदेशीर ठरणार असल्याने याबाबत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता जागृत नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.

पूर्वी भांडार विभागाने  निविदा जाहीर करताना हि अट घातली गेली नसल्याचे निवेदनात श्रीनिवास घाणेकर यांनी नमूद केले होते. या अटीची बाब कोणत्यातरी कंत्राट दारास फायदेशीर ठरेल अशी स्वरूपाची असल्याने यामुळे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची शक्यता घाणेकर यांनी व्यक्त केली होती. आता याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्तांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *