कल्याण : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने आचार्य अत्रे रंगमंदिर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग, कल्याण व महापालिकेतील कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकित सदर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरण्याबाबत व “नारी शक्ती दूत” या ॲपबाबत माहिती देण्यात आली.
या योजनेची माहिती सर्व स्तरातील महिलांना होण्याकामी महापालिकेच्या वतीने 5 लाख पत्रके छापण्यात आलेली असून आशा वर्कर यांच्यामार्फत सदर पत्रके वाटण्यात आलेली आहे. याकरीता महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागांमध्ये या योजनेचा अर्ज भरण्याकरीता व माहिती मिळण्याकरीता स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील सदर योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने लाभार्थी यांचे अर्ज भरण्याकरीता विविध प्रभागात कार्यरत असणारे कर विभागातील कर्मचा-यांची झोन निहाय नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सदर कर्मचारी यांचेवर नियंत्रण ठेवणेकामी समाज विकास विभागाकडील 8 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरीता महापालिकेत समाज विकास विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या NULM चे व इतर बचत गटांतील सर्व महिलांकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. बचत गटातील सचिव यांची या योजनेचे दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांनी आपल्या क्षेत्रातील महिलांना सदर योजनेची माहिती देवून सदर महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास कळविणे. ज्या अर्जदारांच्या कागदपत्रातील त्रृटींबाबत संबधित विभागांशी समन्वय साधून काम करुन घेणे इ. कामे सोपविण्यात आली आहेत.
निवडणूक प्रभाग निहाय 122 प्रभागात प्रत्येकी 3 या प्रमाणे 366 “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मदत कक्ष” स्थापन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे 28 नागरी आरोग्य केंद्रातही मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने कल्याण व डोंबिवली येथील नाटयगृहात मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जांची वॉर्डनिहाय तपासणी होवून पात्र महिलांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्तांनी दिली.














Leave a Reply