कल्याण : शंकर जाधव
आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून मानवता आणि विश्वबंधुत्वाची भावना पसरविण्याचे उदात्त कार्य करत असतानाच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने जनसेवा करत असलेल्या संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, टेमघर पाडा, भिवंडी येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मुसळधार पावसात देखील तब्बल 251 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 210 पुरुष तर 41 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले आणि जे. जे. महानगर रकटपेढी मुंबई यांनी रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.
संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते नामस्मरण करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार रुपेश म्हात्रे, सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे, डॉ. अमोल बीडकर, डॉ. लक्ष्मण पेंडु, डॉ. अंकित यादव आदी मान्यवरांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले. मंडळाच्या विविध शाखांचे मुखी प्रबंधक यावेळी उपस्थित ओते. क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.















Leave a Reply