हभप महादू बाबा झाटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..!
अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित..!
उमेश जाधव
टिटवाळा – कल्याण तालुक्यातील पोई गावातील निष्ठावान वारकरी हभप महादू रामा झाटे (बाबा) यांचे ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले. पोई येथील त्यांची घरून टाळ-मृदूंगाच्या गजरारात व हरिनामाचा जयघोष करत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत कल्याण , मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, बदलापूर व परिसरातील वारकरी, सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
महादू बाबा झाटे यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. झाटे बाबा हे एक निष्ठावान वारकरी होते. त्यांची ज्ञानेश्वरी मुखोगद होती. ज्ञानेश्वरीच्या कोणत्याही अध्यायातील ओवी त्यांना विचारा तीचा ते आर्था सहित विवेचन करत असत. कल्याण, मुरबाड, बदलापूर अंबरनाथ परिसरातील हरिनाम सप्ताहात झाटे बाबा पारायणाचे नेतृत्व करायचे. ते सतत हरिनामात लीन असायचे. तसेच त्यांनी अनेक वर्षे पंढरी व आळंदीच्या वाऱ्या देखील केल्या आहेत. झाटे बाबा कीर्तनात कीर्तनकारा समोर बसले असतील तर कीर्तनकाराला काय बोलावं असा प्रश्न पडायचा इतका त्यांचा आध्यात्मिक गाडा अभ्यास होता. त्यांनी आपल्या नातवंडांना देखील हरिपाठ, ज्ञानेश्वरी व भजन कीर्तनाची गोडी लावली आहे.
झाटे बाबा हे निष्ठावान वारकरी असल्यानेच त्यांचं मरण हे शुभ दिनी झाले आहे. तसेच त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम हा व्दादशीला म्हणजेच गुरुवार दिनांक १८ जूलै रोजी तर उत्तरकार्य हे रविवारी २१ जूलै रोजी गुरुपौर्णिमे दिवशी आले आहे. हा एक उत्तम योगच आहे, कारण ते पांडूरंगाचे निष्ठावान वारकरी होते. म्हणून त्यांचा अंत अतिशय सुंदर झाला असल्याची चर्चा अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित मंडळी व वारकऱ्यांत सुरू होती. एक निष्ठावान वारकरी हरपल्याची चर्चा देखील परिसरात सुरू आहे .














Leave a Reply