कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची आत्महत्या – गुन्हेगाराच्या मृत्यूने सत्य झाकले जाणार नाही

Kalyan case vishal gavali fb123 2024121364442

कल्याण : कल्याणमध्ये डिसेंबर 2024 मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या विशाल गवळीने तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. पहाटे साडेतीन वाजता, शौचालयात जाऊन टॉवेलच्या साहाय्याने त्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, विशाल गवळी या गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीला तिच्याच घरी बोलावून तिच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून मृतदेह एका बॅगेत भरून लपवण्याचा प्रयत्न केला.

विशाल गवळी याच्यावर यापूर्वीही विनयभंगाचे पाच गुन्हे दाखल होते. परिसरात त्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या भयंकर गुन्ह्यात त्याची पत्नी साक्षी हिचीही थेट भूमिका उघड झाली आहे. साक्षी ही खासगी बँकेत काम करत होती. गुन्हा घडल्यानंतर घरी परतल्यावर विशालने घडलेली घटना तिला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. त्यांनी मिळून घरातील रक्ताचे डाग पुसले. विशालने मित्राची रिक्षा बोलावून, त्या रिक्षेत साक्षी आणि विशाल दोघांनी बॅगेत ठेवलेला मुलीचा मृतदेह बापगाव येथे नेऊन फेकून दिला.

या कृत्यानंतर विशाल गवळी दारूच्या नशेत घरून पळून गेला आणि शेगाव येथे लपून बसला होता. पोलीस तपासानंतर त्याला अटक करण्यात आली आणि तो तळोजा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. विशाल गवळीची आत्महत्या हा न्यायप्रक्रियेपासून पळ काढण्याचा भ्याड प्रयत्न असल्याचे समाजात ठाम मत व्यक्त होत आहे. गुन्हेगार मेला तरी गुन्हा मिटत नाही – आणि त्यामुळेच या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून साक्षी गवळीवरही कठोर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे. ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, समाजात अजूनही अशा विकृत प्रवृत्ती जिवंत आहेत – ज्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. याविरोधात कठोर आणि त्वरित कारवाई होणे अत्यावश्यक आहे. गुन्हेगाराचा शेवट म्हणजे प्रकरणाचा शेवट नाही. सत्य उघड होईपर्यंत लढा सुरुच राहील. अश्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *