टिटवाळ्याच्या अदिती दीक्षितची कला काळाघोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये झळकली

Whatsapp Image 2025 01 27 At 1.52.28 Pm (1)

टिटवाळा : मुंबईतील कालाघोडा आर्ट फेस्टिव्हल हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि भव्य कला महोत्सवांपैकी एक मानला जातो. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला आयोजित होणाऱ्या या काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये चित्रकला, शिल्पकला, नृत्य, संगीत, नाट्य, साहित्य आणि हँडीक्राफ्ट्स यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. देशभरातील नवोदित आणि सुप्रसिद्ध कलाकारांसाठी हे एक मोठे व्यासपीठ असून, त्यांच्या कलाकृतींना जागतिक स्तरावर पोहोचवण्याची संधी येथे मिळते.

याच प्रतिष्ठित फेस्टिव्हलमध्ये यंदा टिटवाळ्यातील सिरेमिक आर्टिस्ट अदिती दीक्षित हिला पॉटर्स मार्केटमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. तिच्या इन्स्टाग्राम पेजवरील कलाकृती पाहून कालाघोडा समितीच्या सदस्यांनी तिच्या कौशल्याने प्रभावित होऊन तिला या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

अदितीचे हे पहिल्याच वर्षीचे प्रदर्शन असले तरी तिच्या सिरेमिक कलाकृतींनी देश-विदेशातील कलारसिकांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय पारंपरिक शैलीला आधुनिक सिरेमिक आर्टसोबत जोडण्याच्या तिच्या कल्पकतेचे विशेष कौतुक झाले. इतर सहकलाकारांनीही तिच्या कामाची स्तुती केली, तर समिती सदस्यांनी तिला पुढील वर्षी अधिक मोठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

अदितीची कला केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचत आहे. स्पंदन ग्रुपच्या माध्यमातून तिच्या कलाकृती सध्या पाच युरोपियन देशांमध्ये प्रदर्शित होत असून, तिच्या ‘हडप्पा-मोहंजोदडो सिरीज’ ला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे.

भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाला सिरेमिक आर्टच्या माध्यमातून एका नव्या रूपात सादर करणाऱ्या अदिती दीक्षितच्या भविष्यातील प्रवासाकडे कला प्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. कालाघोडा आर्ट फेस्टिव्हलमधून नवोदित कलाकारांना जागतिक स्तरावर पोहोचण्याची मिळणारी संधी, हेच या फेस्टिव्हलचे महत्व अधोरेखित करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *