उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी केले कौतुक
डोंबिवली ( शंकर जाधव )
आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलाने मोठ्या क्षेत्रात नाव कमवाव असे प्रत्येक आईवडिलांच स्वप्न असते. डोंबिवलीतील एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झाल्याने तिचा आनंद गगनात मावेना.सीए झाल्यानंतर मुलगा आईला भेटल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मुलाला मिठी मारत ‘माझ्या कष्टाच चीज झाल’ असे म्हणाली आणि मुलाच्याही डोळ्यात अश्रू आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी योगेश व त्याच्या आईचे कौतुक केले.
योगेश ठोंबरे हा डोंबिवलीजवळील खोणी गावात राहतो. योगेची आई निरा ठोंबरे या डोंबिवलीतील गांधीनगर परिसरात भाजीचा व्यवसाय करतात. त्या गेली 22 ते 25 वर्षांपासून त्या याच ठिकाणी भाजी विकतात. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते.त्यांनी दोनशे रुपये उसने घेऊन भाजी विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली. बेताची परिस्थिती असताना सुद्धा नीरा यांनी एकट्याने घर, संसार सांभाळत हा व्यवसाय केला. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हार मानली नाही.
योगेश म्हणतो, सीए बनायचं अशी मनाशी ठरवल नी खूप अभ्यास केला रिझल्ट समोर आला आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ही गोड बातमी घेऊन मी आईला सांगायला गेलो तेव्हा आई नेहमीप्रमाणे भाजी विकत होती आईला मिठी मारली आणि हा सर्व क्षण मित्रांनी मोबाईल मध्ये कैद केला.
मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता सीए झाला….
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे याची कल्पना मला नव्हती. मात्र फोन सुरू झाले. अनेक मोठ्या नेत्यांनी ट्विट केले. मराठी माध्यमातून शिकलेला आगरी समाजातला एक मुलगा इंग्रजीची भीती न बाळगता आज सीए झाला. डोंबिवलीकरांनी सुद्धा त्या माऊलीचे कौतुक केले.














Leave a Reply