चंद्रकांत देसले / शहापूर
शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा परिसर पुन्हा एकदा शिवमय होणार असून ग्रामस्थ मित्र मंडळ पष्टेपाडा १ व २ यांच्या वतीने भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे दि. १९ रोजी दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामएकात्मतेचा संगम साधणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. सकाळी शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ग्रामसंस्कृतीची परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सायंकाळी श्रद्धाभावाने सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रात्री ९ वाजता सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे डबलबारी भजनांचा जंगी सामना. भक्तिरसात रंगून जाणारा हा सामना परिसरातील रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. श्रीपती प्रासादिक भजनी मंडळ कोळीवली (कर्जत-नेरळकर) यांच्या वतीने गायिका चंदना आत्माराम डांगरे आपल्या ओजस्वी आवाजात भजने सादर करणार आहेत. तर जय दुर्गा प्रासादिक भजनी मंडळ कुंदे (भिवंडी) यांच्या वतीने गायिका आदिती संजय पाटील भक्तिरसाची उधळण करणार आहेत. या दोन भजनी मंडळांमधील डबलबारी सामन्यामुळे वातावरणात चुरस निर्माण होणार असून भाविकांना भक्ती आणि कलागुणांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. डबलबारी भजनांच्या या रंगतदार सामन्यामुळे पष्टेपाडा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून शिवजयंतीचा उत्सव अधिक संस्मरणीय ठरणार आहे. धार्मिकतेसोबत सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि शिवभक्तीचे प्रतीक ठरणार आहे. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पष्टेपाडा पुन्हा एकदा स्वराज्याच्या प्रेरणेने उजळून निघणार आहे.















Leave a Reply