पाद्यपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अवघ्या ३ तासांत १७८ रक्तदात्यांचे रक्तदान

मुंबई, दि. २ ऑगस्ट : मुंबई पोलीसांचा राजा – वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पाद्यपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या महाआरोग्य शिबिरांतर्गत आयोजित रक्तदान उपक्रमात अवघ्या ३ तासांत तब्बल १७८ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, हा उपक्रम समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरला.
या उपक्रमासाठी हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय, जोगेश्वरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध व सुरक्षितरीत्या पार पाडली.
या यशस्वी उपक्रमासाठी मुंबई पोलीसांचा राजा – वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुंबई पोलीस दल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व सहकारी, हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी, स्वयंसेवक आणि विशेषतः रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तवीरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजसेवेत आपला सहभाग नोंदवावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *