टिटवाळा : अजय शेलार
श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम साधणारा ऐतिहासिक क्षण टिटवाळ्याने आज अनुभवला. टिटवाळा–रुंदे मार्गालगतच्या विस्तीर्ण पटांगणात ‘निसर्गायण’ या महत्त्वाकांक्षी पर्यावरण शिक्षण प्रकल्पाचे भूमिपूजन केडीएमसीच्या महापौर हर्षाली थवील चौधरी दांपत्य यांच्या हस्ते या या प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले आणि धार्मिक ओळखीच्या या नगरीत हरित भविष्याचा ठोस संकल्प रुजला. श्री सिद्धीविनायक मंदिर, टिटवाळाच्या परिसरात उभा राहणारा हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची शास्त्रशुद्ध, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन चळवळ उभारण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हीजल, ठाणे यांच्या संयुक्त पुढाकारातून साकार होत असलेल्या या प्रकल्पाला प्रशासनाची भक्कम साथ लाभली असून, आयएएस अधिकारी तथा महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर ॲड. हर्षली चौधरी, तसेच नगरसेवक संतोष तरे, बंदेश जाधव आणि अमित धाक्रस यांच्या महागणपती मंदिर विश्वस्त सुभाष जोशी , योगेश जोशी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला औपचारिकते पलीकडचे वजन प्राप्त झाले. आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात निसर्गातील गुंतवणूक ही इतर कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारी ठरते, असे स्पष्ट करत या परिसरातून भविष्यात २०० ते २५० कोटी रुपयांच्या मूल्याइतका पर्यावरणीय आणि पर्यटनात्मक लाभ निर्माण होऊ शकतो, असे उदाहरणासहित मांडले. टिटवाळ्यातील गणपती मंदिर आणि नव्याने उभारला जाणारा हा हरित प्रकल्प यांना पर्यटनदृष्ट्या एकत्रितपणे विकसित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला.
महापौर हर्षली चौधरी यांनीही पर्यटनाच्या दृष्टीने या उपक्रमाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची घोषणा करत ‘निसर्गायण’ला शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. वाढते नागरीकरण, बिघडलेले जलसंतुलन, कचऱ्याची गंभीर समस्या आणि हवामान बदलाचे तीव्र परिणाम या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प ज्ञान आणि कृती यांचा दुवा ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रांद्वारे पर्यावरणाशी प्रत्यक्ष नाते जोडण्याची संधी येथे उपलब्ध होणार असून, घोषणांपेक्षा कृतीला प्राधान्य देणारी ही चळवळ टिटवाळ्याला पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रादेशिक केंद्र बनवू शकते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रुंदे रोडवरती श्री स्वामी समर्थ मठासमोर महागणपती मंदिर ट्रस्टच्या जागेत साकारण्यात येणारा हा प्रकल्प परिसरात साकार होणारा हा प्रकल्प अध्यात्म आणि शाश्वत विकास यांचा संतुलित मिलाफ घडविण्याचा प्रयत्न आहे. ‘निसर्गायण’ची पायाभरणी ही केवळ एका उपक्रमाची सुरुवात नसून पर्यावरणीय जबाबदारीची जाहीर घोषणा ठरत असून, पुढील पिढ्यांसाठी हिरव्या विचारांची बीजे रोवण्याचा ठाम निर्धार यातून व्यक्त झाला आहे. श्रद्धास्थानाच्या भूमीतून उगवलेला हा हरित संकल्प भविष्यात टिटवाळ्याच्या विकासाची दिशा बदलू शकतो, असा आशावाद व्यक्त होत असतानाच, पर्यावरणाचे संरक्षण हीच खरी समृद्धीची गुरुकिल्ली असल्याचा संदेश या सोहळ्याने ठळकपणे दिला.















Leave a Reply