ठाणे : शहरातील चहा संस्कृतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने चहा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपर कपविरोधात कडक भूमिका घेत कारवाईचा इशारा दिला आहे. पत्रकार विशाल कुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने तात्काळ हालचाल करत वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सर्व संबंधित विभागांना निर्देश जारी केले आहेत.
शहरातील हॉटेल्स, टपऱ्या आणि चहा स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात पेपर कपचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः, या कपमधील रसायनांमुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका संभवतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या पत्रानुसार, आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याला सूट दिली जाणार नाही. संबंधित विभागांना तातडीने तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळलेल्या हॉटेल्स व चहा विक्रेत्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या निर्णयामुळे शहरातील हजारो चहा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, पर्यायी उपायांचा शोध सुरू झाला आहे. अनेक विक्रेते आता काच किंवा स्टीलच्या ग्लासकडे वळण्याचा विचार करत आहेत.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ठाण्यातील चहा विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास, आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे.
















Leave a Reply