नवी मुंबई : महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची राज्यव्यापी कार्यकारिणी बैठक आणि पदभार समारंभ रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई च्या खारघर येथील लेवे गुजर भवन येथे अत्यंत उत्साहात पार पडला. या बैठकीत आरक्षणाची लढाई अधिक तीव्र करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, वेळ पडल्यास दिल्लीतील जंतरमंतरवर सर्व ओबीसी कार्यकर्त्यांसह भव्य धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या या राज्यव्यापी संमेलनात महाराष्ट्रभरातील विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आपली वज्रमुठ दाखवून दिली.
महाराष्ट्र राज्यातील ३३ ओबीसी जातीसमूहांचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्यासाठी आणि विविध शिष्यवृत्ती तसेच ओबीसी संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीसाठी राज्यातील सर्व ३३ विविध ओबीसी समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत २०२४ मध्ये ‘महाराष्ट्र ओबीसी कृती समिती’ची स्थापना केली. अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी यावेळी सांगितले की, समितीच्या वतीने संयुक्त केंद्रीय आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून, लवकरच सकारात्मक निर्णय येण्याची प्रतीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर लेवे गुजर समाज आणि कराडी समाज यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी मंचावर ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे, कार्याध्यक्ष राम खरपुरिया, संरक्षक डॉ. नामदेव राऊत, महिला विंग कार्याध्यक्ष सरिता गाखरे, सरचिटणीस मोरेश्वर भादे, संरक्षक पी. आर. बडगुजर, सचिव दीपक नेवे, लेवे गुजर समाजाचे अध्यक्ष जी. एम. पाटील आणि कराडी समाजाचे अध्यक्ष महादेव बंडाल हे मंचावर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे आणि समाजप्रमुखांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात अध्यक्ष श्रावण फरकाडे म्हणाले की, “आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळवणारच. ओबीसी समाजाच्या विविध जाती आणि उपजातींना केंद्रात आरक्षण मिळावे यासाठी कृती समिती रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. आम्ही १०० हून अधिक खासदारांची भेट घेतली असून त्यांनी संसदेतही आमचा आवाज उठवला आहे. नोकरी आणि उच्च शिक्षणासाठी समाजातील तरुणांना केंद्रात आरक्षण नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी समिती लवकरच दिल्लीत आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.”
कार्याध्यक्ष राम खरपुरिया यांनी विश्वास व्यक्त केला की, “सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने दखल घेतली असून आरक्षणाचे ९९% काम पूर्ण झाले आहे. आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. न्याय न मिळाल्यास दिल्लीत मोठे आंदोलन उभे केले जाईल.” संरक्षक डॉ. नामदेव राऊत यांनी आरक्षणासाठी केलेल्या पत्रव्यवहाराची आणि कायदेशीर बाबींची माहिती दिली. वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिता गाखरे यांनी ‘संघटन हीच शक्ती’ असल्याचे सांगत महिलांच्या सहभागावर भर दिला. तसेच संरक्षक पी. आर. बडगुजर यांनी महाराष्ट्रातील २७ ओबीसी जातींना न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. नामदेवराव राऊत, प्रकाश सिद्ध, पी. आर. बडगुजर, एस. एम. बडगुजर, शालिकजी नेवारे, मधुकर चोपडे, हेमंत ढोले, नरेंद्र बडगुजर, मुकुंद मुसळे, सलमानी समाज चे अध्यक्ष मकसूद हसन सलमानी, प्रसिद्धी प्रमुख आशाद शेख, प्रल्हाद कासकर, शांताराम गुजर, विलास पाटील, ॲड. चंद्रकांत बिडकर यांसह अनेक मान्यवरांनी ही मार्गदर्शन केले. पदभार स्वीकार समारंभात सर्व पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. समितीने मागासवर्ग आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर आणि वर्तमान अध्यक्ष साध्वी महामंडलेश्वर यांचे आभार मानले.
दुपारच्या सत्रात ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी यांच्या निधनाची बातमी समजताच दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विविध ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कराडी समाजाचे उपाध्यक्ष मधुकर सुरते यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. लेवे गुजर समाज आणि कराडी समाजाच्या वतीने सर्व सदस्यांसाठी अल्पोपहार व भोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली होती.
















Leave a Reply