मांडा–टिटवाळ्यातील ऐतिहासिक दरगाहमध्ये उर्स; हजारो भाविकांची गर्दी, रूहानी वातावरणात परिसर रंगला

Compressed whatsapp image 2026 02 12 at 6.16.39 pm (1) (2)

टिटवाळा, वार्ताहर : नेयाज शेख 

टिटवाळा पश्चिम या ठिकाणी असलेल्या मांडा गाव येथील हाजी अब्दुल नबी व हाजी अब्दुल शफी रहमतुल्लाह अलैह या सख्ख्या भावांच्या ऐतिहासिक मजारवर यंदाही पारंपरिक श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात उर्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ३०० वर्षांपासून आस्थेचे केंद्र ठरलेल्या या दरगाहमध्ये मागील दीडशे वर्षांपासून उर्स साजरा करण्याची परंपरा अखंडपणे सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांनी येथे हजेरी लावली.

उर्सनिमित्त १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बाबांच्या नावाने नियाज (श्रद्धेने अर्पण केलेले आणि नंतर वाटलेले अन्न) ठेवण्यात आला असून सुमारे २००० भाविकांसाठी विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. दूरदूरवरून आलेल्या भाविकांनी दरगाहमध्ये चादर अर्पण करून आपल्या मन्नती व्यक्त केल्या, तर अनेकांनी धागा बांधून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. दिवसभर दरगाह परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. विविध खेळणी आणि विविध प्रकारच्या विशेष मिठाई घेण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी ओसंडून वाहत होती .

उर्स सोहळ्यानिमित्त १३ फेब्रुवारी रोजी दरगाह परिसरात भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध कव्वाल जुनैद सुल्तानी तसेच हैदराबादचे सुप्रसिद्ध कव्वाल गुलाम वारिस साहेब आपल्या सूफियाना कव्वालींची मैफल रंगवणार असून या कार्यक्रमामुळे दरगाह परिसर रूहानी वातावरणाने भारून जाणार आहे. या कव्वालींच्या सुरावटीत भाविक आध्यात्मिक अनुभूतीत तल्लीन होतात. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह अन्य राज्यांतूनही मोठ्या संख्येने जायरीन (श्रद्धाळू) या उर्ससाठी उपस्थित राहत असून संपूर्ण रात्र इबादत, दुआ आणि जिक्रमध्ये व्यतीत केली जाते. दरगाहचे व्यवस्थापक सदर साहेब अयूब खलीफा व मुखलीस काबडी साहेब यांनी सांगितले की, “बाबांच्या मजारवर जो कोणी सच्च्या मनाने मन्नत मागतो, त्याची प्रत्येक नैतिक इच्छा पूर्ण होते. दरवर्षी वाढणारी भाविकांची संख्या हीच त्याची साक्ष आहे. असल्याचे यावेळी अशफाक मांडेकर ,हाजी आयुब खलिफा, मुखलेश काबाडी , सलमान शेख , समीर फक्की , फारुखभाई यांनी सांगितले .

उर्स सोहळ्यादरम्यान पोलिस प्रशासनच्या वतीने सुरक्षा व सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना शांततेत व श्रद्धेने कार्यक्रमात सहभागी होता यावे, यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे टिटवाळा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी सांगितले . धार्मिक श्रद्धेचा उत्सव असलेल्या या उर्समधून आपसी भाईचारा, प्रेम आणि सामाजिक एकतेचा संदेशही दिला जात असल्याने परिसरात भक्तिमय आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाह्यला मिळाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *