‘कोरडा’ पुस्तकाचे प्रकाशन आणि श्याम उबाळे यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस सोहळा उत्साहात

उल्हासनगर : प्रतिनिधी

सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱ्या श्याम उबाळे लिखित ‘कोरडा’ या पुस्तकाचे प्रकाशन उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये दिमाखदार सोहळ्यात पार पडले. श्याम उबाळे यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या मातोश्री कुसुमबाई यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात प्रख्यात दलित साहित्यिक प्रा. आशा कांबळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान मोठ्या एलईडी स्क्रीनवर उबाळे कुटुंबीयांचे नातेवाईक, रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी तसेच श्याम उबाळे यांच्या पत्नी सारिका यांनी व्यक्त केलेली मनोगते आणि उबाळे तसेच त्यांच्या आई-वडिलांच्या जीवनप्रवासावरील चित्रफीत दाखविण्यात आली. ही चित्रफीत कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. शेखर उबाळे यांनी प्रास्ताविक करत कुसुमबाई आणि श्याम उबाळे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आढावा मांडला. उबाळे कुटुंबातील अनेक सदस्य विविध क्षेत्रात मानाची पदे भूषवत असून त्यामागे स्मृतिशेष बुधाजी उबाळे यांचे संस्कार आणि योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्याम उबाळे यांच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत सादर करण्यात आली. रेल्वे प्रवासी संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.

‘कोरडा’ या पुस्तकात विविध सामाजिक प्रश्न तसेच काही सरकारी धोरणांवर परखड भाष्य करण्यात आले आहे. आपल्या मनोगतात श्याम उबाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जीवनात आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजासाठी योगदान देण्याच्या प्रेरणेने गेल्या २८ वर्षांपासून आदिवासी पाडे, आश्रमशाळा, वृद्धाश्रम तसेच सामान्य प्रवाशांच्या समस्यांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. आशा कांबळे यांनी मनोगतात श्याम उबाळे यांच्या मातोश्री आणि पत्नी यांच्या योगदानाचे कौतुक केले. ‘कोरडा’ या पुस्तकात समाजातील विदारक वास्तवाचे प्रभावी चित्रण करण्यात आले असून सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, सुशिक्षित तरुण आणि पत्रकारांनी हे पुस्तक वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान बोधामृत सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने केडीएमसीचे निवृत्त शहर अभियंता अर्जुन अहिरे, मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त शहर अभियंता महेंद्र उबाळे, जिल्हा परिषदेतून निवृत्त केंद्र शिक्षक जगदीश गायकवाड तसेच पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त अशोक घणगाव यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव उबाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल जाधव, सचिन गायकवाड, श्रीकांत उबाळे, अक्षय उबाळे, गौरव गायकवाड, वैभव उबाळे, सुगत गायकवाड, अजय घणगाव आणि प्रविण जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *