‘रक्तदानातून शिवजयंतीचा मानवतेचा जागर!

Whatsapp image 2026 02 20 at 2.27.58 pm

राजेश्री शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठानचा आठव्या वर्धापनदिनानिमित्त तिटवाळ्यात भव्य रक्तदान उपक्रम

शिवरायांचा वारसा चालवायचा असेल तर समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले पाहिजेत – वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी

टिटवाळा, वार्ताहर : छत्रपतींच्या जयंतीचा जयघोष केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो थेट मानवसेवेच्या कृतीतून साकारला गेला, अशी प्रेरणादायी घटना तिटवाळ्यात अनुभवास आली. राजेश्री शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान, टिटवाळा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव २०२६ तसेच संस्थेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेत लोककल्याणाचा जो गाभा आहे, त्याच तत्त्वाची प्रचीती देणारा हा उपक्रम समाजमनाला स्पर्श करून गेला.

या रक्तदान शिबिरात मांडा ग्रामीण शाखेतील कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे भान जपले. सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान करून सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या सोबत महेश बर्डे, जयेश वावरे, अहिमद तसेच अविनाश विसल यांनीही रक्तदान करत समाजाप्रती आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कार्यालयीन जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवत त्यांनी दाखवलेली तत्परता उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.

सध्याच्या काळात अपघात, शस्त्रक्रिया व आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची कमतरता जाणवत असताना अशा शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. रक्तदान हे केवळ दान नसून जीवदानाचा सेतू आहे, ही जाणीव या उपक्रमातून प्रकर्षाने पुढे आली. समाजहितासाठी उचललेले हे पाऊल केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता मानवतेचा उत्सव ठरला. यापप्रसंगी उपस्थित असलेले टिटवाळा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ” रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून , या दानाने कोणाला तरी जीवदान मिळते . खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा चालवायचा असेल तर असे समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले पाहिजे आणि तीच खरी शिवरायांना मानवंदना असेल” अश्या भावना यावेळी व्यक्त केल्या .यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती .

राजेश्री शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत असून, मांडा ग्रामीण शाखा कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेला सहभाग सामाजिक उत्तरदायित्वाची जिवंत साक्ष ठरला आहे. शिवजयंतीचा उत्सव केवळ ऐतिहासिक स्मरणाचा दिवस न राहता तो समाजसेवेचा प्रण बनावा, असा संदेश या रक्तदान शिबिरातून प्रभावीपणे उमटला आहे. मानवतेचा हा दीप अशाच उपक्रमांतून अधिक तेजोमय होत राहील, हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *