पूरग्रस्तांसाठी भाजपाची धावपळ; मांडा-टिटवाळ्यात होडीतून मदत, हजारो नागरिकांना अन्नदान

Md 24 work.00 09 03 21.still004

टिटवाळा वार्ताहर :

मांडा परिसरात सकाळपासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने शेकडो कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. नागरिक घरात अडकून पडल्याने भीतीचे वातावरण पसरले. या कठीण परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तत्काळ मदतीसाठी पुढे सरसावले.

माजी नगरसेविका उपेक्षा भोईर व टिटवाळा शहराध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी फायर ब्रिगेडच्या सहकार्याने होडीतून पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यांनी नागरिकांची विचारपूस करत परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य केले.

मांडा पश्चिम भागात स्वप्निल पाठारे, महेश घोलप, सुरेश जगदाळे, जिगीशा जैयस्वाल, नयना कडलक, नितीन मढवी, अजय मिश्रा यांनी सक्रिय भूमिका बजावली. तर मांडा पूर्व भागात गजानन मढवी, गिरीश भोय, अमोल केदार, भूषण बापट, शैलेश देशपांडे, सुभाष पिसाळ, किरण पाटील, यश नलावडे, संजय राऊत यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्य केले. याचबरोबर टिटवाळा शहरातही किरण रोठे, दिलीप तरे, गणेश वारघडे यांनी हातभार लावला.

संध्याकाळी मदतकार्यातील पुढील टप्प्यात घरअंगण येथील चाळीत सुमारे 200 नागरिकांसाठी तसेच मांडा पश्चिम स्मशानभूमी परिसरात सुमारे 1200 नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आले. महिलांपासून लहान मुलांपर्यंत अनेकांना या भोजनामुळे दिलासा मिळाला.

उपेक्षा भोईर व शक्तिवान भोईर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “नागरिक संकटात असताना त्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी सेवा आहे,” असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनी भाजपच्या या तत्पर मदतकार्यासाठी कौतुक केले आणि भविष्यातही अशी मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *