प्रशासक न नेमल्यास मंत्रालयात धडक देण्याचा दिला इशारा
कल्याण : कुणाल म्हात्रे
पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित करण्याच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ माजी विद्यार्थ्यांचे ‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ या मोहिमेंतर्गत साखळी उपोषण सुरू आहे. महिना उलटूनही शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, धर्मादाय आयुक्त प्रशासनाला जाग आली नाही. त्यांना जागे करण्यासाठी रविवारी पेंढरकर महाविद्यालय ते इंदिरा गांधी चौक अशी निषेध रॅली काढण्यात आली.
प्रशासक नेमला नाहीतर आंदोलन शिक्षण विभाग संचालक, मंत्रालय, कुलगुरूंच्या दालनापर्यंत पोहोचेल, असा इशारा आंदोलनाचे संयोजक माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी दिला. रॅली महाविद्यालयासमोरून पुढे घरडा सर्कल, शेलार चौक, टिळक पथ, फडके मार्ग, बाजीप्रभू चौक ते इंदिरा गांधी चौक अशी काढण्यात आली. रॅलीत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, रिक्षा संघटना, फळ-फूल-भाजी विक्रेत्यांच्या विविध संघटना, भारत मुक्ती मोर्चा, प्रोटॉन आदींसह मोठ्या संख्येने डोंबिवलीकर नागरिक सहभागी झाले होते. कॉम्रेड काळू कोमास्कर, संजय मांजरेकर, काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष केणे, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे यांचीही उपस्थिती होती.
डोंबिवलीच्या शिक्षण संस्कृतीच्या नावाला बट्टा लावणाऱ्या मुजोर संस्थाचालकांना हटवा, प्रभाकर देसाईंना अटक करा, पेंढरकर कॉलेज विनाअनुदानित होऊ देऊ नका, संचालक उच्च शिक्षण विभाग असे लिहिलेले फलक घेऊन आंदोलकांनी घोषणा दिल्या. टाळ-मृदंग, संबळ वादन करून निद्रिस्त अवस्थेतेतील यंत्रणांना जागे करण्याचा प्रयत्न झाला.














Leave a Reply