ब्रेल लिपीतील पंचविसावे पुस्तक प्रकाशित

राजेंद्र घरत यांचे ब्रेल लिपीतील पंचविसावे पुस्तक प्रकाशित

कल्याण : कुणाल म्हात्रे 

वरिष्ठ पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ‘गणपती, गीते आणि गानरसिक’ आणि ‘शिकण्याचं वय’ या ब्रेल लिपीतील चोवीसाव्या आणि पंचविसाव्या पुस्तकांचे प्रकाशन पंचनदी, दापोली येथील ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, संगीतकार इकबाल शर्फ मुकादम यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. याचवेळी नवी मुंबई महानगर पालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या ‘राष्ट्रीय सण’ व ‘भारतीय सण’ दोन या पुस्तकांचे प्रकाशनही मुकादम यांच्या हस्ते पार पडले.

स्नेहज्योती अंध निवासी विद्यालय, घराडी, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र घरत लिखित ‘मुशाफिरी’ या लेखमालेतील निवडक लेखांचा समावेश त्यांच्या दोन पुस्तकांत करण्यात आला आहे. यावेळी आपले विचार मांडताना मुकादम म्हणाले की,  लेखनाच, सेवेचं वेड असावं लागतं. राजेंद्र घरत यांच्यामुळे आज या अंधशाळेत येण्याचा योग आला असून ब्रेल लिपी, रेकार्डिंग यामुळे दृष्टीहीनांनाही आता शारीरीक कमजोरीवर अंशतः विजय मिळवून ज्ञान, माहिती मिळवणं सोपं झालं आहे. आपण मुस्लिम असलो तरी श्रीकृष्ण हे आपले आवडते दैवत असून श्रीकृष्ण-राधेवरही आपण गीतरचना केल्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली व स्नेह ज्योती अंधशाळेत आपण यानंतर येऊन यथाशवती जे करणं शवय होईल ते करु असे आश्वासन त्यांनी दिले.

या सर्व लेखनाचे ब्रेल रुपांतर या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांच्या मेहनतीमुळे दृष्टीहीन मुलांसमोर जात असल्याचा आनंद यावेळी लेखक राजेंद्र घरत यांनी यावेळी आपल्या मनोगतपर भाषणातून व्यक्त  केला व  आपल्या दिवंगत मातेचेही नाव प्रतिभा असल्याने सेनगुप्ता यांच्यात आपण आपली आईच पाहात असून गेल्या पंधरा-सोळा वर्षात केवळ त्यांच्यामुळेच आपली पंचवीस पुस्तके ब्रेलमध्ये येऊ शकली, याहीपुढे येतील असे घरत आपल्या भाषणात पुढे म्हणाले.

चित्रा बाविस्कर यावेळी आपले विचार मांडताना म्हणाल्या की साहित्य ही मानवी जीवनाची गंगोत्री आणि मनाची मशागत करण्याचा उत्तम स्त्रोत असून साहित्यसेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला कृतकृत्य समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *