मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी `आयएएस’चा ध्यास घ्यावा !

माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव !

मुरबाड, दि. ९-(बाळासाहेब भालेराव)

मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सकारात्मक भावना व संपूर्ण आत्मविश्वासाने आयएएस, आयपीएस होण्याचा ध्यास घ्यावा. तसेच प्रत्येक शिक्षकाने आईच्या भूमिकेत येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी माऊली गार्डनच्या सभागृहात आज येथे केले.
भाजपा व कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने मुरबाड तालुक्यातील दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि कला-क्रीडा क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या ४६६ व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात कपिल पाटील बोलत होते. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, जिल्हा परिषदेचे सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, माजी नगराध्यक्ष किसन कथोरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, अॅड. वैशाली घरत, नारायण गोंधळी, बाळू हरड, दीपक खाटेघरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी अॅड. अदिती निटुरे यांनी विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शन केले.
सध्याच्या बदलत्या काळाचे भान राखत विद्यार्थ्यांकडून दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदिपक कामगिरी बजाविली जात आहे. काही विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुणांपर्यंत झेप घेतली. या विद्यार्थ्यांनी देशात सर्वोच्च स्पर्धा परीक्षा असलेली यूपीएससीत सहभागी देऊन आयएएस व्हावे. कल्याण तालुक्यातील आपटी गावचे डॉ. रवींद्र शिसवे हे आयपीएस होऊन रेल्वे पोलिस आयुक्त झाले. तर कर्जतच्या छोट्या गावातील प्रतीक जुईकर याने युपीएससीत झेंडा फडकविला. या दोघांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. सकारात्मक भावना व अंतिम ध्येय गाठण्याचे निश्चित करून जीवनाला दिशा द्यावी, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
जगातील सर्वात श्रेष्ठ शाळा ही आई आहे. आईप्रमाणेच प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, मधुकर मोहपे, उल्हास बांगर यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *