रायते नदीत दोन तरुणांचा दुर्दैवी अपघात — छठ पूजेच्या वेळी पाण्यात बुडून बेपत्ता, शोधकार्य सुरू

Whatsapp image 2025 10 28 at 3.16.39 pm

टिटवाळा, वार्ताहर : कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायते गावाजवळ काल (सोमवार) सायंकाळी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाले. घटनास्थळी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असले, तरी अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रायते नदीच्या घाटावर छठ पूजेचा विधी सुरू होता. त्या ठिकाणी उपस्थित असताना प्रिन्स गुप्ता (वय 16) आणि राजन विश्वकर्मा (वय 18) हे दोन तरुण नदीकाठी आले. त्याचवेळी एक मुलगा पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पुढे सरसावला, मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहात सापडून वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळवले. टिटवाळा पोलिसांसह कल्याण तालुका पोलीस, अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात शोधकार्य चालवले. मात्र अंधारामुळे ते काम थांबवावे लागले. आज (मंगळवार) सकाळी पुन्हा सात वाजल्यापासून बचाव पथकांनी शोध मोहीम सुरू केली आहे. शोधकार्यात स्थानिक तरुण, गोताखोर आणि ग्रामपंचायतीचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. नदीचा प्रवाह आणि पाण्याची खोली यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप या दोन्ही तरुणांचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. घटनेमुळे रायते गाव तसेच परिसरात शोककळा पसरली असून, छठ सणाचा आनंद क्षणात विरला आहे. ग्रामीण भागातील नागरिक नदीकाठच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नलावडे करत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *