घटनेनंतर सुरुवातीला मृताची ओळख पटवणे आणि आरोपीचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र गुन्हे प्रकटीकरण कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयम व तांत्रिक कौशल्याचा वापर करत तपासाची दिशा निश्चित केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग मुंबईतील दादर, परेल, नागपाडा आणि शिवाजी पार्क परिसरापर्यंत पोहोचला.
तत्काळ कारवाई करत पोलिसांनी योगेश एकनाथ राणे (वय 40) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान उघडकीस आलेल्या माहितीने सर्वांना धक्का बसला. 20 एप्रिल रोजी आरोपी आणि त्याचा मित्र राजू प्रभुळकर खडवली येथे आले होते. किरकोळ कारणावरून—पैशांच्या वादातून—दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात आरोपीने दगडाने वार करत मित्राची निर्घृण हत्या केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपीचा गुन्हेगारी भूतकाळही समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्यात 2014 साली खून आणि दरोड्याचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तसेच मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक तपासाची अचूक दिशा यामुळे आरोपी अल्पावधीतच जेरबंद झाला.















Leave a Reply