आंबिवली : संतोष निरभवणे
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोहने शहरात प्रचंड उत्साहात, जल्लोषात आणि रेकॉर्डब्रेक गर्दीत साजरी करण्यात आली. शहरातील विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या वतीने भव्य प्रबोधनात्मक देखावे, सजावटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमांमध्ये क्रांतीसूर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठान अंतर्गत कार्यरत प्रज्ञासूर्य सामाजिक संस्था यांचा देखावा व रोषणाई नेहमीप्रमाणे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य सार्वजनिक मिरवणूक, सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष दासू ठोंबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रज्ञा बुद्ध विहार, आर.एस. जेतवन नगर येथून सायंकाळी सहा वाजता वाजत-गाजत सुरू झाली.
या मिरवणुकीत माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, माजी सभापती दयाशंकर शेट्टी, माजी नगरसेवक विजय काटकर, अंकुश जोगदंड, राम तरे, माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह हजारो महिला, पुरुष, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. डीजेच्या ठेक्यावर सहभागींचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता.
मिरवणूक पंचशील नगर, आर.एस. बाजारपेठ, महात्मा फुले नगर, विकास कॉलनी मार्गे मोहने बाजारपेठेतून होत बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथील पुतळ्यापर्यंत पोहोचली. तेथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. फटाक्यांच्या आकाशबाजीसह मिरवणुकीची सांगता झाली.
मिरवणुकीदरम्यान सामाजिक सलोखा व स्वागताची परंपरा जोपासत आर.एस. रिक्षा स्टँड येथील चालकांच्या वतीने सरबत वाटप, तर इतर मार्गांवर लाडू व मिठाईचे वाटप मंडळांकडून करण्यात आले.
संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी वाघमोडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीने लक्ष ठेवले. अखेर रात्री साडेदहा वाजता ही भव्य मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.














Leave a Reply