राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेत सहभाग
आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची देखील केली मागणी
कल्याण : कुणाल म्हात्रे
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वालधुनी नदीचे संवर्धन करण्यासोबतच आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याच्या दोन प्रमुख मागण्या कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केल्या आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत राज्य शासनाचे कौतुक करत आमदार विश्वनाथ भोईर यांनी या दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वालधुनी नदीला आज अक्षरशः नाल्याचे रुप प्राप्त झालं आहे. एकीकडे ड्रेनेजचे तर दुसरीकडे रासायनिक कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या घाणेरड्या पाण्यामुळे वालधुनी नदीची अवस्था बिकट झाली आहे. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वालधुनी नदी संवर्धन प्रक्रियेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी मांडली.
तसेच वालधुनी नदीतील गाळ काढून ती स्वच्छ करावी. तिचे खोलीकरण केल्यास या नदीच्या काठावर असलेल्या घोलप नगर, भवानी नगर, योगिधाम आदी मोठमोठ्या गृहसंकुलांना पावसाळ्यात पुराचा वेढा पडणार नाही आणि दिलासा मिळेल असे आमदार भोईर यांनी यावेळी सभागृहात सांगितले. तसेच या नदीच्या संवर्धनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान वालधुनी नदी बचावासाठी 1990 पासून आज पर्यंत काम करत असणारे सुनील उतेकर, पुष्पा रत्नपारखी, गणेश नाईक, पंकज डोईफोडे, अंबरनाथ शहरामधून कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या रेखा अत्तरदे, प्रमुख मार्गदर्शक शशिकांत दायमा यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले आहेत.
नदी संवर्धनासाठी सतत सरकारी कार्यालयामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवेदन देऊन नदी साफ करण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार, साखळी उपोषण, सह्यांची मोहीम, नदीचे पूजन, जनजागृती करत ही बाब लक्षात घेता स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून येणाऱ्या बजेटमध्ये नदी संवर्धन करण्यासाठी नदीची खोली वाढवा, रुंदी वाढवा, नदीची पूररेषा निश्चित करा, नदी प्रदूषण मुक्त करा व विकासक यांनी नदीमध्ये भराव टाकून जी नदी अरुंद केली आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी सतत मागणी करत होते.














Leave a Reply