शाळाबाह्य किशोरवयीन मुलींसाठी जीवनकौशल्य कार्यशाळा…

Img 20250829 wa0016

 

पालघर : निलेश कासट

विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी बुद्रुक येथील शाळाबाह्य मुलामुलींसाठी गणेशोत्सवाच्या सुट्टीचा सदुपयोग करत कुटुंब जीवन कौशल्य शिक्षण कार्यशाळांचा माता-बाल आरोग्य अधिकारी विक्रमगड यांच्या सहकार्याने २७ ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमात ग्रामीण व आदिवासी भागातील शाळाबाह्य मुलामुलींना व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य-जागरूकता आणि जीवनकौशल्य या विषयांची मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतली जात आहे.
या उपक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते वसंत भसरा (MSW) यांनी हे लाभले असून या कार्यशाळेत मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. कौटुंबिक जीवनातील मूल्ये, संवाद कौशल्य, आत्मविश्वास वाढविणे, निर्णयक्षमता, तसेच किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रामध्ये मुलींनी सक्रिय सहभाग घेऊन प्रश्न विचारले, गटचर्चेत भाग घेतला तसेच जीवनकौशल्य आत्मसात करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले. त्यांच्या सहभागातून आणि सकारात्मक प्रतिसादातून आयोजकांना अत्यंत समाधान लाभले.
या कार्यशाळांचा उद्देश ग्रामीण भागातील शाळाबाह्य किशोरवयीन मुला-मुलींना जीवन कौशल्यांच्या माध्यमातून शिक्षणाशी पुन्हा जोडणे, समाजाभिमुख विचार विकसित करणे आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेणे हा आहे.
या उपक्रमाचे महत्व सांगताना “हा सामाजिक कार्याचा प्रवास केवळ उपक्रमापुरता मर्यादित नसून, सतत सुरू राहणारा आहे. थांबला न सूर्य कधी, थांबली न धारा – धुंद वादळास कोठला किनारा! या प्रेरणेतूनच ही कार्यशाळा पुढेही सुरूच राहणार असल्याचे ठाम मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *