रस्त्याच्या मध्यभागी ‘मृत्यूचा सापळा’; ममता ज्वेलर्ससमोर उघड्यावर पडलेला लोखंडी डिव्हायडर, भीषण अपघाताची घंटा वाजू लागली

टिटवाळा : अजय शेलार 

टिटवाळा शहरात वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा टोकावर पोहोचला आहे. टिटवाळा पूर्वेकडील गणेश मंदिर रोड मुख्य रस्त्याच्या मध्यभागी ममता ज्वेलर्ससमोर  लोखंडी डिव्हायडरचा मोठा भाग उखडून अक्षरशः रस्त्यावर आडवा पडलेला असून त्याच्या टोकाला जड सिमेंटचा तुकडा उघड्यावर असल्याने दररोज दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक मृत्यूच्या छायेतून प्रवास करत आहेत. रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेचा अभाव, पावसामुळे घसरडा झालेला रस्ता आणि अचानक समोर उभा ठाकलेला हा अडथळा यामुळे कोणत्याही क्षणी भीषण अपघात घडू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते, हा केवळ डिव्हायडर नसून ‘यमराजाचा सापळा’च ठरू लागला आहे.

घटनास्थळी पाहणी केली असता लोखंडी गजांचा संपूर्ण तुकडा मूळ पाया सोडून रस्त्याच्या मध्यावर कोसळलेला दिसतो. त्याच्या पुढे सिमेंटचा मोठा दगडी भाग रस्त्यात घुसलेला असल्याने वेगात येणाऱ्या वाहनचालकांना तो क्षणात दिसणे कठीण जाते. विशेषतः रात्री दुचाकीस्वारांना तोपर्यंत अडथळा लक्षात येत नाही, जोपर्यंत वाहन अगदी जवळ पोहोचत नाही. अशा वेळी अचानक ब्रेक मारताना घसरणे, समोरून येणाऱ्या वाहनावर आदळणे किंवा चारचाकीने थेट या दगडी तुकड्यावर धडक देणे, ही शक्यता नाकारता येत नाही. परिसरात दुकाने, फेरीवाले आणि सततची वर्दळ असल्याने अपघात झाल्यास त्याचे परिणाम आणखी गंभीर ठरू शकतात.

काही दिवसांपूर्वी गणेश मंदिर रोडवर भरधाव डंपरने अनेक वाहनांची चिरडाचिरड करत शहराला हादरवले होते. त्या घटनेनंतर वाहतूक सुरक्षेबाबत कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आता ममता ज्वेलर्ससमोरील हा उघडा पडलेला डिव्हायडर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे प्रतीक ठरत आहे. एकीकडे जड वाहनांचा बेफाम वेग, दुसरीकडे रस्त्यावर पडलेले संरचनात्मक अडथळे आणि त्यावर कोणतीही तात्पुरती सुरक्षा व्यवस्था नसणे, ही दुहेरी जोखीम नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे स्पष्ट होते.

स्थानिक व्यापारी व रहिवाशांनी तात्काळ दुरुस्तीची मागणी केली असून संबंधित विभागाने या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष करू नये, असा इशाराच दिला आहे. केवळ अपघात घडल्यानंतर पंचनामा आणि कारवाईची भाषा न करता, संभाव्य संकट टाळण्यासाठी वेळीच हस्तक्षेप करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आज हा लोखंडी डिव्हायडर नुसता पडलेला दिसत असला, तरी उद्या तो एखाद्याच्या आयुष्यावर कोरलेली जखम ठरू शकतो. टिटवाळ्यातील वाहतूक व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित असताना, आणखी एका दुर्घटनेची वाट न पाहता तातडीने ठोस उपाययोजना करणे हीच खरी नागरिकाभिमुख भूमिका ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *