धाडसी घरफोड्या करणाऱ्यांचा खात्मा! ठाणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ग्रामस्थांकडून शहापूर पोलिसांचा जाहीर सन्मान

Img 20260124 wa0032

टिटवाळा प्रतिनिधी : घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन दिवसा तसेच रात्री निर्ढावपणे घरफोड्या व चोऱ्या करणाऱ्या सराईत टोळीवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी निर्णायक घाव घालत मोठी धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईमुळे टिटवाळा, कल्याण, शहापूर व बदलापूर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी साखळीचा पूर्णतः पर्दाफाश झाला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन शहापूर पोलिसांचा भव्य सन्मान केला.

कल्याण तालुक्यातील पत्रकार संजय कांबळे यांचे कुटुंबीय बाहेरगावी असताना त्यांच्या निवासस्थानी दिवसाढवळ्या घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. त्याच धर्तीवर बदलापूर व शहापूर परिसरातही सलग घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या. या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे व मुरबाडचे डिवायएसपी अनिल लाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तयार करून समांतर तपास सुरू करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास अधिक वेगाने पुढे गेला. कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी, शहापूर पोलीस ठाण्याचे मुकेश ढगे, उपनिरीक्षक अलोक किसमतराव यांच्या नेतृत्वाखालील पथक दिवसरात्र आरोपींच्या मागावर होते. अखेर अत्यंत नियोजनबद्ध आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत धुळे जिल्ह्यातून या सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली आणि गुन्हेगारी टोळीवर निर्णायक घाव घालण्यात आला.

या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण परिसरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यांकन समितीचे सदस्य संजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चेतन लगड, सुरेश गायकवाड, कु. हिमांशू कांबळे, शेरे-वाशिंदचे किशोर पंडित, भगवान उबाळे यांच्यासह टिटवाळा, कल्याण व शहापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन डिवायएसपी मिलिंद शिंदे व त्यांच्या संपूर्ण पथकाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. यावेळी भिवंडीचे डिवायएसपी राहुल झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच कल्याण तालुका पोलीस ठाण्यात मुरबाडचे डिवायएसपी अनिल लाड, टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी व त्यांच्या पथकाचाही नागरिकांच्या वतीने गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, डिवायएसपी अनिल लाड व डिवायएसपी मिलिंद शिंदे यांच्या सूचनेनुसार शहापूर विभागाचे प्रभारी अधिकारी मुकेश ढगे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पो.उपनि. अलोक किसमतराव, पो.हवा. शशिकांत पाटील, मंजूर शेख, पो.ना. विकास सानप, पो.अंमलदार रमेश नलावडे, मोहन भोईर, दशरथ देसले, जितेंद्र गिरासे, कमलाकर शिरोसे, अमित दुबळा, मनिषा गांगुर्डे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली समन्वयपूर्ण, शिस्तबद्ध व धाडसी कामगिरी सध्या संपूर्ण ठाणे ग्रामीण पोलीस दलात आदर्श ठरत आहे.

ही कारवाई केवळ गुन्हेगारांवर कारवाई करणारी नसून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणारी आणि कायद्याचा धाक पुन्हा अधोरेखित करणारी ठोस पोलिसी यशोगाथा ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *